
अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी पूर्वी खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के गुण,मागासवर्गीय आणि अन्य प्रवर्गासाठी 45 टक्के गुण आवश्यक होते; मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 62 हजार जागा रिकाम्या रहात होत्या. अनेक विद्यार्थी परराज्यात जाऊन प्रवेश घेत होते. त्यामुळे आता आम्ही प्रवेशासाठी टक्केवारीची अट कमी केली आहे. खुल्या वर्गासाठी 45 टक्के आणि मागासवर्गीय व अन्य वर्गासाठी 40 टक्के गुणांची अट करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रिक्त जागा भरतील, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सामंत पुढे म्हणाले की, औषधनिर्माण आणि वास्तुशास्त्र पदवीसाठी गुणांची टक्केवारी बदलण्यात आली आहे. खुल्या गटासाठी 45 आणि मागासवर्गीय व अन्य प्रवर्गासाठी 40 टक्के गुणाची अट करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परराज्यात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी महाराष्ट्रातच प्रवेश घेतील. हा निर्णय सर्व शासकीय आणि खासगी महाविद्यालयांना लागू होईल असे सांगताना, या वर्षी हा नियम यशस्वी झाल्यास तो कायमस्वरूपी करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
‘उमेद’ ही महिला बचत गटासाठी काम करणारी संस्था असून ती बंद होणार असा गैरसमज पसरवला आहे. मी आज उमेदचे प्रमुख प्रवीण जैन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ते म्हणाले की, आम्ही ‘उमेद’ बंद करणार नाही तसेच कोणत्याही कर्मचाऱयांना काढणार नाही. केवळ कर्मचाऱयांचा पगार हा आऊटसोर्सिंगने होईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.



























































