
विश्वचषकात अंतिम फेरीत चोकर्स ठरण्याची परंपरा आज दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेट संघाने कायम राखली. संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळ करणारा दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य लढतीत इंग्लंडपुढे अगदी अपयशी ठरला. इंग्लंडच्या डॅनी व्याटची 125 चेंडूंतील 129 धावांची तुफानी खेळी आणि त्यानंतर झंझावाती गोलंदाजी करीत सोफी एक्लेस्टोनने 36 धावांत घेतलेल्या 6 विकेट या कामगिरीच्या बळावर इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिका संघाला अक्षरशः 137 धावांनी पराभूत केले. इंग्लंडच्या 293 या धावसंख्येसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ 38 षटकांत 156 धावांवर आटोपला.
सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठणाऱया इंग्लंडचा सामना आता स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. विशेष म्हणजे विश्वचषकात दक्षिण आफ्रिकन पुरुष आणि महिला संघ अद्याप वन डे अथवा टी-20च्या अंतिम फेरीत मजल मारू शकलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 विकेट गमावून 293 धावा केल्या. इंग्लंडकडून डॅनी व्याटने शतक झळकावले.




























































