
यजमान इंग्लंडने ओव्हल येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. घरच्या मैदानावर या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणारा ओली पोप (81 धावा) व अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स (50 धावा) यांनी शानदार अर्धशतके झळकावताना इंग्लंडला पहिल्या डावात 99 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. हिंदुस्थानचा पहिला डाव 191 धावांमध्ये गुंडाळणाऱया इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा फटकावल्या.
हिंदुस्थानची दुसऱया दिवसाची सुरुवात छान झाली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर व्रेग ओव्हर्टन एक धावेवरच स्लीपमध्ये उभ्या विराट कोहलीकरवी झेलबाद झाला. त्यानंतर उमेश यादवनेच डेव्हील मलान यालाही 31 धावांवर रोहीत शर्माकरवी झेलबाद करीत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामुळे इंग्लंडची अवस्था 5 बाद 62 धावा अशी बिकट झाली.
यानंतर ओली पोप व जॉनी बेअरस्टो या जोडीने 89 धावांची भागीदारी रचत यजमानांचा डाव सावरला. दोघांची जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो 37 धावांवर पायचीत बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मोईन अलीनेही ओली पोपसोबत महत्त्वपूर्ण 71 धावांची भागीदारी रचली. रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर मोईन अलीने 35 धावांवर विकेट गमावली.
ओली पोपने सहा चौकारांसह 81 धावांची खेळी साकारत इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पण शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. रवींद्र जाडेजाने ओली रॉबीनसनला 5 धावांवर बाद केले.






























































