इंग्लंड संघाचे वास्तव्य असलेल्या हॉटेलजवळ गोळीबार

इंग्लंडचा संघ 17 वर्षानंतर पाकिस्तानात आला असून पाहुण्या संघाने पाकिस्तानचा पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभव केला होता. दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार असून या सामन्यापूर्वी एक चिंताजनक घटना घडली आहे. मुलतान भागामध्ये गुरुवारी गोळीबार झाला आहे. हा गोळीबार इंग्लंडचे क्रिकेटपटू ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत, तिथपासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर झाला आहे.

पाकिस्तानमधील वर्तमानपत्र इंडीपेंडटने दिलेल्या बातमीत म्हटलंय की हा गोळीबार 2 गटात झाला होता आणि पोलिसांनी या गोळीबाराप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार इंग्लंडचा संघ सरावासाठी हॉटेलमधून बाहेर पडण्याच्या काही काळ आधी हा गोळीबार झाला होता. या गोळीबारामुळे इंग्लंडच्या संघाच्या सरावावर कोणताही परिणाम झाला नाही. इंग्लंडच्या संघाला या दौऱ्यासाठी राष्ट्रपती दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे.