पबजीच्या नादात पाणी समजून अॅसिड प्यायला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

भोपाळमधील छिंदवारा येथे पबजी या खेळाचे व्यसन एका 25 वर्षीय विवाहीत तरुणाच्या जीवावर बेतलं. पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पबजी या खेळाच्या आहारी गेलेला हा तरुण महिन्याभरापूर्वी काम करता करता मोबाईलवर पबजी खेळत होता. तो त्या खेळात इतका दंग झाला कि पाणी समजून तो चक्क बाजूला ठेवलेल्या बाटलीतलं अॅसिड प्यायला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. महिन्याभराच्या उपचारानंतर तो बरा झाला आहे. पण त्याचं पबजीच व्यसन सोडवण्यात मात्र अपयश आल्याची खंत त्याच्यावर उपचार कऱणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

छिंदवारा येथे राहणाऱा हा तरुण विवाहीत असून त्याला एक मुलगाही आहे. तसेच तो एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. पण संबंधित तरुणाला मोबाईल गेमचे भलतेच व्यसन आहे. उठता बसताना ,काम करताना, जेवताना, झोपताना अगदी रस्त्यावरून चालतानाही तो मोबाईलवर गेम खेळतो. त्याच्या या पबजी व्यसनाला घरातील सगळेच कंटाळले आहेत. पत्नीनेही त्याला अनेकवेळा समजावले पण तो कोणाचेही ऐकत नव्हता. गेल्या महिन्यात असाच तो घरातील अंगणात मोबाईलवर पबजी खेळत होता. खेळण्यात तो इतका दंग झाला की अंगणातली जमीन स्वच्छ करण्यासाठी ठेवलेले अॅसिडची बाटली त्याने पाणी समजून उघडली व अॅसिड तो घटाघटा प्यायला. त्यानंतर मात्र त्याला आपली चूक समजली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. अॅसिडमुळे त्याच्या तोंडापासून पोटापर्यंतची त्वचा भाजली होती. आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. पोटात अनेक अल्सर निर्माण झाले होते. त्यामुळे त्याचे जेवणच बंद झाले. अखेर त्याला छिंदवारा येथून नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे त्याची प्रकृती आणखीनच खालावली. यामुळे त्याला पुन्हा छिंदवारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिन्याभराच्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतित सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.