नव्या वर्षात सरखेल कान्होजी आंग्रे दीपगृहात नाईट सफारीचा आनंद घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोर्ट ट्रस्टने देशातील 70 दीपगृहांचा विकास पीपीपी मॉडेलमार्फत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील रायगड जिह्यातील सरखेल कान्होजी आंग्रे दीपगृहाचा पीपीपी मॉडेलद्वारे विकास करण्यात येणार असून डिसेंबर 2022मध्ये या दीपगृहावर पर्यटकांना ‘नाईट सफारी’ करता येणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टने स्पष्ट केले आहे. कान्होजी आंग्रेबरोबरच भविष्यात संक रॉक तसेच गोव्यातील अग्वाद तसेच उत्तन, कोरलई, जयगड, रत्नागिरी, देवगड, वेंगुर्ला व टोलकेश्वर आदी दीपगृह पर्यटनांच्या नकाशावर येणार आहेत.

कान्होजी आंग्रे बेट अलिबाग बेटापासून 5 कि.मी. तर भाऊच्या धक्क्यापासून 25 कि.मी. अंतरावर वसले असून मुंबई ते अलिबाग वॉटर टॅक्सी सेवाही उपलब्ध होणार आहे. येथे ट्रेकिंग, प्रेक्षणीय गॅलरी, तंबू किंवा राहुटय़ा, आराम खुर्च्या, रेस्टॉरंट, कलासादरीकरण, संपूर्ण रात्रीच्या मुक्कामाची सहल आदींची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 50 कोटी असून खाजगी आणि सरकारी भागीदारीतून पीपीपी मॉडेलद्वारे या दीपगृहाचा (लाईट हाऊस) पुनर्विकास करण्यात येणार आहे. नव्या वर्षात जानेवारी महिन्यात हे दीपगृह पर्यटकांसाठी खुले होईल असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी सांगितले.

मुंबईच्या बंदरात शिरणाऱया नौकांना रायगड जिह्यातील कान्होजी आंग्रे हे दीपगृह दिशादर्शक म्हणून काम करायचे. जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या दीपगृहांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची योजना आणली असल्याची माहिती पोर्ट ट्रस्टच्या सूत्रांनी दिली.

25 मीटरचे दीपगृह इतिहास जागविणार…

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या पहिल्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने हे दीपगृह आहे. थळ गावासमोर खांदेरी आणि उंदेरी ही दोन बेटे आहेत. नोव्हेंबर 1670मध्ये तीन हजार मावळ्यांच्या मदतीने महाराजांनी तीन दिवस खांदेरी व उंदेरी बेटांची टेहळणी केली होती. 1678मध्ये खांदेरीवर किल्ला बांधण्यास प्रारंभ केला होता. खांदेरीचा किल्ला तसेच इथे असलेले 1867मध्ये बांधलेले षटकोनी आकाराचे 25 मीटर उंचीचे दीपगृह, आवाज येणारे दगड आणि इतिहासाची साक्ष देणाऱया चाके असलेल्या तोफा हा सारा इतिहास आता पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे.