
ग्रीन झोनमध्ये असलेल्या बीड जिल्ह्यातील नागरिकांना सध्या कोरोनाच्या फैलावाची भीती सतावत आहे. राज्यातील हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधून मोठ्या संख्येने नागरिक बीड जिल्ह्यात दाखल होत आहेत. शहरासह जिल्ह्यातील गावागावात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात येण्याची परवानगी मिळालेले पासद्वारे शहरात येत आहेत. तर पास नसतानाही अनेकजण तपासणी नाके चुकवून शहरात प्रवेश करत असल्याने धोका वाढला आहे.
बीड जिल्ह्यात लॉकडाऊनसह इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. जिल्हाप्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन यांनी कोरोना रोखण्यासाठी मेहनत घेतली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही आणि जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या बीड जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांचा ओघ वाढतच आहे. वैध आणि अवैध मार्गाने अनेकजण जिल्ह्यात येत आहेत. हॉटस्पॉट आणिन कंटेन्मेंट झोनमधूनही अनेक कुटूंब परतत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या हॉटस्पॉटमधून चौघांचे एक कुटूंब दुचाकीवर चेकपोष्ट चुकवून बीड जिल्ह्यात दाखल झाले आहे. सुमारे 10 तासांचा प्रवास करून हे कुटूंब गावात दाखल झाले, तेव्हा गावातही खळबळ उडाली. आरोग्य प्रशासनाने त्यांची तपासणी केली आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. पण आता जिल्ह्याची धाकधूक वाढली आहे. परवानगीशिवाय येणाऱ्या प्रवाशांना रोखण्याची गरज व्यक्त होत आहे.































































