
संजीवनी धुरी-जाधव
गणेशोत्सव सातासमुद्रापार केव्हाच पोहोचला आहे. आतातर समुद्रपर्यटन करणाऱ्या जहाजावरच गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी घरापासून दूर असलेल्या मराठमोळ्या तरुणांनी चक्क क्रूझवरच गणेशोत्सव साजरा केला आहे.
देशाबरोबरच परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. क्रूझवरही केला जातो. समुद्रात मोठमोठ्या जहाजांवर मुंबईतून अनेक तरुण-तरुणी महिनोंमहिने घरापासून दूर क्रूझवर कामाला येतात. अशावेळी क्रुझवर बाप्पा आणून तिथे आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात. ब्रिटानिया या क्रूझवर शेफ असलेले प्रशांत नाईक सांगतात, क्रूझवर गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. घरापासून दूर क्रूझवर काम करायला येतात. त्यामुळे सहा-सहा, नऊ-नऊ महिने घरी जाता येत नाही. अशावेळी क्रुझ हेच त्यांचे घर असते. त्यामुळे घरापासून दूर जरी असलो तरी आपले सण उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करतो. गेली सहा वर्षे आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. कोरोनामुळे यंदा गणोशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. पण बाप्पाच्या कृपेने कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला क्रुझ प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली.

क्रुझवर वेगवेगळ्या देशातून काम करायला आलेली आमच्यासारखी तरुणमंडळी असते. सुरवातीला खूप वेगळा वाटणारा हा सण त्यांनाही आता आपलासा वाटू लागला. तेही आता या सणाचा आनंद घेतात. एवढेच नव्हे तर तयारीसाठीही उत्साहाने भाग घेतात. दरवर्षी असेल त्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सजावट करण्याचा प्रयत्न करत असतो. यंदा आम्ही सजावटीसाठी ब्रिटानिया या आमच्या शिपचे मॉडेल तयार केले असून त्यात बाप्पाची मूर्ती बसवली आहे. बाप्पाची मूर्ती पर्यावरणपूरक असून मुंबईतून सुशांत पत्रा या मित्राने त्याच्या जॉईनिंगमुळे महिनाभरापूर्वीच आणली होती. त्यानंतर महिन्याभरापासूनच तयारीला लागलो होतो. प्रत्येकजण आपली ड्युटी करुन फावल्या वेळेत सजावटीसाठी मदत करत होते. बाप्पाच्या निमित्ताने आम्ही एकत्र जमतो, एकत्र वेळ घालवतो, खूप आनंदाचे वातवरण असते. बाप्पाच्या मूर्तीपाशी मी, सोनू परब. अभिषेक वालझडे, विखेश शर्मा, सुशांत पत्रा, आशुतोष चिपकर, विशाल, विरु, विरेंद्र या सर्वांनी आपले योगदान दिले, आम्ही आळीपाळीने मूर्तीपाशी थांबायचो. रात्रपाळी असलेले दिवसा थांबतात आणि दिवसपाळी असलेले रात्री थांबत असल्याचे प्रशांत सांगतो.
युट्युबवर व्हिडीओ बघून बाप्पाची पूजा
मुर्तीची स्थापना वेळेनुसार शुक्रवारी पहाटे केली. शिवाय गुरुजी नसल्याने दरवर्षीप्रमाणे आम्हीच युट्युबवर व्हिडीओ बघून बाप्पाची पूजाअर्चा केली. त्यानंतर आरती केली. एवढेच नाही तर बाप्पासाठी उकडीच्या मोदकाचा नैवेद्यही बनवतो. दिवसातून दोनवेळा आरती केली जाते. त्यावेळी क्रुझवरचे बरेचजण आरतीसाठी वेळ काढून येतात. कोरोनाचे नियम पाळत अंतर राखून आरतीसाठी उभे राहतो. आरती झाल्यावर तो परिसर सॅनिटायझरने स्वच्छ करतो. तसेच दरवर्षी एका टबमध्ये बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करतो.





























































