
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
नवी दिल्ली गेल्या तीन वर्षांत प्रथमच वाढविण्यात आलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील वार्षिक व्याजदरामुळे निधीचे व्यवस्थापन पाहणाऱया केंद्रीय विश्वस्त मंडळाकडे अतिरिक्त 151.67 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर चालू वित्त वर्षाकरिता वाढीव व्याजदराची शिफारस भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने केली आहे. सध्याच्या 8.55 टक्क्यांऐवजी वार्षिक 8.65 टक्के व्याज देऊनही संघटनेकडे अतिरिक्त 151.67 कोटी रुपये राहत असल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी याबाबतच्या बैठकीनंतर सांगितले. वार्षिक 8.70 टक्के व्याज दिले गेले असते तर 158 कोटी रुपयांची कमतरता भासली असती, असेही गंगवार यांनी स्पष्ट केले.
दुप्पट किमान मासिक निवृत्तीवेतनाचा निर्णय लांबणीवर
कर्मचाऱ्यांचे किमान मासिक निवृत्तीवेतन दुप्पट करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकीत लांबणीवर टाकला. याबाबत मंडळाच्या मार्चमधील बैठकीत निर्णय होईल, असे कामगारमंत्र्यांनी स्पष्ट केले. याकरिता 3000 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. किमान मासिक निवृत्तीवेतन सध्याच्या 1000 रुपयांवरून 2000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.




























































