
नगर जिल्ह्यात उन-पावसाचा खेळ सुरू असून वातावरणामध्ये सतत बदल होत आहेत. या बदलामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील बहुतांश सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लू सदृश्य तसेच डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. दुसरीकडे दिवसेंदिवस आजाराचे लक्षणे असणारे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
दोन वर्षे कोरोनामुळे अनेकांना त्रास झाला. तर काहीजणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. नगर जिल्ह्यामध्ये सातत्याने साथीच्या आजाराचे थैमान सुरू असून ते वाढत चासल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यातच नगर जिल्ह्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संसर्गजन्य आजाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात दिसू लागले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
ढगाळ वातावरण, साठलेले पाणी, वाढलेले गवत यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून यामुळे जिल्ह्यात किटकजन्य आणि विषाणूजन्य आजार वाढले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी कोविडप्रमाणे लक्षणे असणाऱ्या आणि जीवघेण्या ठरणाऱ्या स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असून खासगी रुग्णालय फुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात जानेवारी ते 26 ऑगस्टअखेर डेंग्यूचे 115, तर स्वाईन फ्लूचे 34 रुग्ण सापडले आहेत. मात्र, खासगी रुग्णालयातील चित्र वेगळे आहे.
आतापर्यंत स्वाईन फ्लूने सातजणांचा मृत्यू झाला असून, संगमनेर, कोपरगाव, राहाता, पारनेर व नगर तालुक्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडलेले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार डेंग्यूची 34 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत एनएस 1 (संशयित डेंग्यू) 71 रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूची चाचणी महागडी असल्याने लक्षणानुसार उपचार करण्यात येत असून, गंभीर रुग्णांची स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात येत आहे.
स्वाईन फ्लूचे संगमनेरमध्ये 15 रुग्ण; दोघांचा मृत्यू
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार स्वाईन फ्लूचे संगमनेर तालुक्यामध्ये 15 रुग्ण आढळले असून, सर्व रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एका रुग्णांचा मृत्यू नाशिकच्या खासगी रुग्णालयात, तर दुसऱ्याचा संगमनेर येथे खासगी रुग्णालयात झाला आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण होते. हे तीनही रुग्ण उपचारादरम्यान दगावले आहेत. यात दोन मृत्यू नाशिक येथे खासगी रुग्णालयात, तिसरा मृत्यू नगर सिव्हिल येथे झाला आहे. पारनेर तालुक्यामध्ये स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण होते. यातील एकाचा नगर सिव्हिल हॉस्पिटल येथे मृत्यू झाला असून, दोघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. नगर तालुक्यामध्ये स्वाईनचा एक रुग्ण होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. राहाता तालुक्यामध्ये एक रुग्ण सापडला होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोनाप्रमाणेच स्वाईन फ्लूची लक्षणे असून, घसा दुखीसोबत ताप आणि खोकला असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन आरोग्य चाचण्या कराव्यात. दुर्धर आजारपीडित, गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करावे त्यामुळे स्वाईन फ्लूपासून बचाव शक्य आहे. डेंग्यू टाळण्यासाठी दिवसा डास चावणार नाही, याची काळजी घ्यावी. अनावश्यक पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
– डॉ. पीयूष पाटील, जनरल फिजीशन, नगर
लक्षणे आढळल्यास उपचार घ्यावेत
ताप, तीव्र घसादुखी आणि खोकला असल्यास स्वाईन फ्लूचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तातडीने शासकीय अथवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत. विद्यमान स्थितीत जिह्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूमुळे रुग्ण व्हेंटिलेटरपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण काही वैद्यकीय तज्ञांनी नोंदवले आहे. शासकीय आरोग्यसेवेत संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन पुण्याला तपासणीसाठी पाठविले जात आहेत. जिह्यात डेंग्यू, स्वाईन फ्लू संसर्गाचा प्रसार अधिक होऊ नये, झाला तर तो आटोक्यात यावा, यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. स्वाईन फ्लू रुग्णांचे निदान करण्यासाठी गावागावांतील सर्दी, पडसे व खोकला असणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण केले जात आहे. स्वाईन फ्लूमध्ये संसर्गाचे गांभीर्य पाहून आरोग्य विभागाकडून टॅमी फ्लू हे औषध देण्यात येत आहे.
डेंग्यूच्या आढळलेल्या रुग्णांची संख्या
नगर 3, श्रीगोंदा 5, कर्जत 2, पाथर्डी 2, नेवासा 2, राहुरी 8, श्रीरामपूर 4, राहाता 35, कोपरगाव 10, संगमनेर 22, अकोले 6, पारनेर 5 एकूण 105 डेंग्यू रुग्ण आहेत.

























































