
लहान मुलाचे अपहरण करून निघालेल्या भरधाव वाहनाच्या धडकेत दोघेजण ठार झाले. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ही घटना घडली. अपघातानंतर नगर-पाथर्डी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गंगा बुधवंत (रा. शिरापूर, ता. पाथर्डी) आणि रमेश नरवडे असे ठार झालेल्यांची नावे आहेत. अजय पिराजी पवार (रा. पाथर्डी) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून, गाडीतील अन्य दोघे फरार आहेत.
पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मायंबा येथे तीन तरुणांनी एका लहान मुलाला बळजबरी करीत इर्टिंगा गाडीत बसवले आणि भरधाव वेगाने ते तिसगावमार्गे नगरकडे निघाले होते. मुलाचे अपहरण होत असल्याचे पाहून नागरिकांनी इर्टिगा गाडीचा पाठलाग केला सुरू केला. भरधाव जाणाऱ्या इर्टिगा गाडीने तिसगाव येथील मढी फाटा येथे रमेश नरवडे या तरुणाला धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबताच तिसगाव बसस्थानकाजवळ इर्टिगाने स्कुटीला धडक दिली. यामध्ये गंगा बुधवंत हे जागीच ठार झाले, त्यांचे सहकारी बाळू केदार जखमी झाले. यानंतर ईिटगाने इंडिका गाडीला धडक दिली. यात इंडिकातील तरुण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे तिसगाव येथे दाखल झाले. अपघाताने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. दरम्यान, इर्टिगा गाडीतील दोन तरुण पळून गेले, तर अजय पवार हा जवळच घराच्या जिन्याखाली लपला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या लहान मुलाचे अपहरण केले होते. त्याला तरुणांनी वाटेतच सोडून दिले होते.






























































