
माथेरानची सैर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी नेरळ स्थानकात सरकता जिना सुरू करण्यात आला आहे. फलाट क्रमांक एकवर हा स्वयंचलित जिना बसवण्यात आला असून शुक्रवारपासून तो प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे. या जिन्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांची फरफट थांबणार आहे.
पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला जाण्यासाठी मध्य रेल्वेचा शेवटचा स्टॉप म्हणजे नेरळ स्टेशन. त्यामुळे या स्टेशनवर हजारो पर्यटकांची दररोज गर्दी असते. मात्र या स्टेशनवर सरकत्या जिन्याची सुविधा नसल्याने नागरिकांना पायपीट करत पादचारी पुलाने फलाट ओलांडावे लागत होते. त्यामुळे वृद्ध, विकलांग आणि गर्भवती महिलांना त्याचा फटका बसत होता. प्रवासी तसेच पर्यटकांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा सरकता जिना सुरू केला. पहिल्या डब्याजवळ आणखी एक सरकता जिना बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती स्थानक प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी दिली.




























































