पावसाळा तोंडावर; नगर महापालिका उदासीन; वर्षापूर्वी वर्कऑर्डर निघूनही अनेक कामे ‘जैसे थे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा तोंडावर आला असतानाच पावसाळापूर्व कामांबाबत नगर महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे समोर आले आहे. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागच ‘आपत्तीग्रस्त’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्षापूर्वी वर्कऑर्डर होऊनही अजूनही सुरू न झालेल्या कामांच्याबाबत सर्व काही ‘जैसे थे’ राहणार आहे. त्यामुळे शहरातील रस्ते आणि नालेसफाईबाबत अति तातडीने निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर पुन्हा एकदा नगरकरांवर ‘आपत्ती’ला तोंड देण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

नगर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली असून, पावसाळापूर्व नालेसफाईची कामे बाकी आहेत. याबाबत संबंधित अभियंते व ठेकेदारांकडे विचारणा केली असता, सदर रस्त्यांची टेंडर प्रोसिजर एक वर्षापूर्वीच पूर्ण झाली आहे. वर्कऑर्डरही निघाली आहे. मात्र, एकाचे काम झाल्याशिवाय दुसऱयाला काम करता येत नसल्यामुळे अनेक कामे ‘जैसे थे’ अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईल नेटवर्कच्या केबलची खोदाई, फेज टूची कामे, गटार योजनांची कामे ही एकमेकांमध्ये समन्वय नसल्यामुळेच रखडली आहेत.

त्यात भर म्हणजे युक्रेन युद्धामुळे डांबर व तत्सम मटेरियलमध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सदर रस्त्याच्या टेंडरिंगमध्ये एक्सलेशन प्राईसची तरतूदच नसल्यामुळे ठेकेदाराला टेंडरची किंमत वाढवून देता येत नसल्यामुळे कामे सुरू झालेली नाहीत. जर पैसे वाढवून दिले नाही, तर रस्ते कोणत्या दर्जाचे होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. याबाबत जागरूक नागरिक मंचाने आयुक्तांना निवेदन दिलेले आहे.

ज्या-ज्या वॉर्डातील रस्ते आणि नालेसफाईची कामे बाकी आहेत. तेथे पावसाळ्यामध्ये बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नालेसफाईसाठी फक्त दोनच मशिन उपलब्ध झाली असून, त्यांनादेखील एक आठवडय़ाचा कालावधी अपुरा ठरणार आहे. पाऊस झाला, तर मशिन नाल्यात उतरवून सफाई करणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे नगरची ‘तुंबई’ होण्याची शक्यता अधिक आहे. भुयारी गटार योजनेचे, तर अगोदरच तीन तेरा झाले आहेत. बहुतांश ठिकाणी ड्रेनेजचे मॅनहोल तुटून ते उघडे पडले आहेत. त्यामुळे पावसाळय़ात गटारमधून कारंजे पाहण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे.

या सर्व पातळींवर शहराचे आपत्ती व्यवस्थापनच ‘आपत्तीग्रस्त’ असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासंबंधी तातडीने बैठक घेऊन दिवस-रात्र काम करून येणाऱया धोक्याची तीव्रता कमी करावी, ठेकेदारांचे प्रश्न सोडवून त्यांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत व अनेक ठिकाणचे तुटलेले ड्रेनेजचे मॅनहोल कव्हर व नालेसफाई याचे व्यवस्थापन करावे, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी केली आहे. अन्यथा या नांगरलेल्या रस्त्याच्या जीवघेण्या खड्डय़ांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका झाल्यास नाईलाजास्तव सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवणे भाग पडेल, असा इशाराही मुळे यांनी दिला आहे.