
सामना ऑनलाईन, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये जे कल समोर आले आहे त्यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार अशी स्पष्ट चिन्ह दिसायला लागली आहेत. हे कल पुढे आल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित करायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जे यश मिळताना दिसत आहेत ते मोदींचे आहे की ईव्हीएमचे असा प्रश्न विचारला आहे.
एनडीए बहुमताकडे वाटचाल करत असल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेस नेता राशिद अल्वी यांनीही पुन्हा ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. काही दिवसांपू्र्वी लोकसभा निवडणुकांवेळी ईव्हीएमच्या माध्यमातून मोठी खेळी केली जाईल असे वादग्रस्त विधान अल्वी यांनी केले होते. त्या विधानावर आपण आजही कायम असल्याचे अल्वी यांनी म्हटले आहे. तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित याने ही मोदी लाट असल्याचे मान्य केले आहे. ज्या पद्धतीने ट्रेंड दिसतोय ते पाहता ही मोदी लाटच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
एप्रिल महिन्यात विरोधकांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएम मशिन हॅक होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ‘शिक्का मारून मतदान करण्याची पद्धत बंद झाली आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आल्या. पूर्वी बोगस मतदान, बूथ कॅप्चरिंग हे प्रकार घडायचे. आता या ईव्हीएम मशीन्स हॅक केल्या जातात. हा हॅकर हजारो कोसावरूनही ईव्हीएम मशीन्सवर नियंत्रण ठेवू शकतो. इथल्या निवडणुकांचे निकाल बदलू शकतो जगभरात असे दावे केले जातात’ असं विरोधकांनी म्हटले होते. लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स रशियामधून नियंत्रित केल्या जात असल्याचा त्यांचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. हिंदुस्थानातील ईव्हीएम मशिन हॅक करण्यासाठी रशियन हॅकर्संना कोटय़वधी रुपये देण्यात आल्याचाही आरोप नायडू यांनी केला होता.

























































