नगरमध्ये माजी सैनिकांचे आठव्या दिवशीही उपोषण सुरूच, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची उपोषणस्थळी भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहराजवळील दरेवाडी परिसरातील लष्कराने स्थानिक रहिवाशांच्या दळणवळणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा, या मागणीसाठी आजी-माजी सैनिकांसह स्थानिक रहिवाशांनी जामखेड रोडवरील लष्कराच्या स्टेशन हेडक्वॉर्टरसमोर गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली.

तत्पूर्वी बंद केलेल्या नगरवाला रस्त्याची पाहणी तहसीलदार संजय शिंदे यांनी केली. त्यानंतर उपोषणस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. हा रस्ता लष्कराच्या मालकीचा नसताना संरक्षणच्या नावाखाली रस्ता बंद केला आहे. येथे राहणारे आम्ही देशप्रेमी आहोत, कायदा मानतो, सैन्यात होतो, पण रस्ता का बंद केला, संरक्षणाच्या नावाखाली बंद केला गेला तर रहिवाशांचे ओळखपत्र पाहून परवानगी द्यावी तसेच रस्ता बंद का केला? कोणाच्या परवानगीने बंद केला? हे पाहून आमचा रस्ता खुला करून द्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या भेटीनंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, दरेवाडीचे उपसरपंच अनिल करांडे, माजी सैनिकांचे प्रतिनिधी यांनी लष्कराच्या स्टेशन हेडक्वॉर्टरमध्ये एडीएम कमांडर यांच्याशी चर्चा करून रस्ता खुला करण्याची मागणी केली. यावर सकाळी साडेसहा ते रात्री 9 पर्यंत हा रस्ता खुला राहील, नंतर रात्री बंद करण्यात येईल, असे लष्करी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्याची माहिती उपोषणकर्त्यांना देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती अधिकाऱयांनी केली. यावर पूर्वीप्रमाणे पूर्ण वेळ रस्ता खुला करावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली. त्यामुळे या रस्त्याचा तिडा आठव्या दिवशीही सुटला नाही.

यावेळी दरेवाडीचे उपसरपंच अनिल करांडे व ग्रामस्थ उपोषणकर्ते प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, सैनिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. संजय शिरसाठ, संजय निमसे, अशोक चौधरी, वसंत दहातोंडे, राहुल ताकपिरे, पुष्पा मुंढे, मंदाबाई ठोबरे, प्रियांका तापकीर, मोहिनी ननवरे, मंगल निमसे, कमल अन्सारी, आजी-माजी सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक रहिवासी उपस्थित होते.