परीक्षण- जीवनासाठी प्रभावी मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीकांत आंब्रे

बदलत्या जगात, बदलत्या समाजात आपण प्रवाहाबरोबर वाहून जाणार आहोत की स्वतःचे स्वत्व जपण्याबरोबरच प्रेमाची सत्ता असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या चार मूल्यांच्या आधारांवर चालणाऱया जगासाठी आणि शोषणविरहित समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत? या प्रश्नांची उत्तरे साध्या, सोप्या संवादात्मक शैलीत देण्याचा प्रयत्न ‘रुजवण, संविधानिक मूल्यांची’ या पुस्तकात लेखिका सुषमा सामंत यांनी केला आहे. त्यांचे विचार अगदी स्पष्ट आहेत आणि ते मांडण्याची पद्धतही अतिशय सुबोध आहे. माणसे भौतिक सुधारणा सहजतेने आपल्याशा करतात, पण सामाजिक सुधारणा प्रयत्नपूर्वक घडवून आणाव्या लागतात. हजारो वर्षांपासून मनात ठाण मांडून बसलेल्या अन्यायकारक धारणांचा त्याग करून तिथे नवीन विचार रुजवणे व त्यानुसार वर्तन करणे फार कठीण काम असते. म्हणून आपण ते टाळत राहतो. आपले म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी लेखिका म्हणतात, आपण भावना, विचार, बोली, देहबोली, कृती व सवयी अशा विविध पातळींवर काय व कसे काम करायचे या विषयीचा हा एक संवाद आहे. आपण सगळे मिळून हे जग अधिक सुंदर करू शकतो या विश्वासाने हे लिखाण केले आहे.

 

लेखिकेने आपले व दुसऱयांचे अनुभव खेळकरपणे सांगत वाचकांशी हा संवाद साधला आहे. आपली देहबोली हा जणू आपले सर्व मनोव्यापार दाखवणारा आरसा असतो, हे त्यांचे विधान कुणालाही पटण्यासारखे आहे. पुरुषाने असेच वागले पाहिजे आणि बाईने असेच वागले पाहिजे, अशी या समाजाची साचेबद्ध विभागणी पुरुषसत्ताक जीवन व्यवस्थेच्या वर्चस्वाची निशाणी होती आणि त्यातूनच स्त्रीला कसे जेरबंद केले याची उदाहरणे लेखिका देते. आजची एकूण समाजरचनाच अन्याय्य असून अनेकदा आपली स्वतःची वर्तणूकही अन्यायकारक असते, हे सत्य आपण स्वीकारणार का? आपण सगळय़ांचा विचार माणूस म्हणून करणार का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे आणि स्वतःमध्ये अनुरूप बदल करायचे आहेत, या विचारप्रक्रियेला त्या चालना देतात.

 

माणूस असणे म्हणजे नेमके काय हे सांगताना सर्वांसाठी सुंदर आयुष्याची इच्छा करणे आणि ते सुंदर जीवन प्रत्यक्षात आणण्यासाठी वेळप्रसंगी वैयक्तिक स्वार्थ दूर सारून स्वतः सातत्याने  प्रयत्न करणे, जग बदलण्यासाठी सर्वप्रथम स्वतः बदलणे कसे गरजेचे आहे हा विचार स्पष्ट करण्यासाठी त्या जागतिक तत्त्ववेत्त्यांची तसेच अगदी सामान्य घरातल्या 88 वर्षांच्या वयोवृद्ध आजीच्या आदर्श जीवनपद्धतीची माहिती देतात.

 

आजच्या काळात संवाद कौशल्याचे महत्त्व कसे अधिक आहे हे पटवून देतात. तसेच अन्याय, अत्याचाराला जिथल्या तिथे तत्काळ असा प्रखर विरोध करा की अन्याय करण्यासाठी पुन्हा हिंमत होता कामा नये हे कटाक्षाने सांगतात.

 

‘स्त्रियांवरील अत्याचार’ या प्रकरणात देशातील स्त्रियांवर झालेल्या विविध पाशवी अत्याचार, बलात्कार, लैंगिक हिंसाचार याचा अलीकडच्या बदलापूर येथील बालिकेवर झालेल्या क्रूर बलात्कार प्रकरणापर्यंत आढावा लेखिकेने घेतला आहे व अशा प्रकरणी सत्ताधारी वर्गाचे वर्तनही आठवा असेही सुनावले आहे. आपल्या समाजात स्त्रियांवरील अत्याचारांची, अन्यायाची मालिका तिच्या जन्माआधीपासून सुरू होते आणि ती मेल्यानंतरही मिटतेच असे नाहा, हे लेखिकेचे विधान समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. आपल्याला पुरुषसत्ताक समाज नको आहे, तसेच पुरुषांवर अन्याय करणारा स्त्राrसत्ताक समाजही नको आहे, हे स्पष्ट करताना त्यासाठी स्त्री-पुरुषांनी नेमके काय करायला हवे याचे मार्गदर्शनही लेखिकेने केले आहे.

 

स्त्री म्हणून आपण या व्यवस्थेचे बळी असलो तरी तिला तोंड देण्यासाठी स्त्रियांनी काय काळजी घ्यावी, स्वतःत काय बदल करावा हेही लेखिकेने ‘स्त्रियांनी काय करावे?’ या प्रकरणात अतिशय आपुलकीने विस्ताराने मांडले आहे. तसेच ‘पुरुषांनी काय करावे’ या प्रकरणात पुरुषांनाही विस्तृत मार्गदर्शन केले आहे. कायदे हे पुरुषांच्या विरोधात नसून ते अन्याय्य पुरुषसत्तेच्या विरोधात आहेत हेही स्पष्ट केले आहे. ‘संस्कृती रक्षणा’च्या नावाखाली आपण पूर्वीसारखेच वागणार का? असा लेखिकेने केलेला सवाल नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

 

इतके सुंदर आणि सुस्पष्ट विचार परखडपणे मांडणाऱया लेखिका सुषमा सामंत यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर आाफ अॅडमिनिस्ट्रेटीव्ह मॅनेजमेंट’ ही पदवी मिळवली असून एअर इंडियात विविध पदांवर 25 वर्षे त्या कार्यरत होत्या. रशियन भाषेत आडव्हान्स डिप्लोमा व मास्कोमध्ये रशियन भाषा शिक्षकाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. या व्यतिरिक्त फ्रीलान्सर म्हणून रशियन भाषांतर तसेच दुभाषाचे काम त्यांनी केले आहे. वाचनाची, शिकण्याची आणि शिकवण्याची आवड असल्यामुळे विविध सामाजिक संस्थांतर्फे मराठी भाषा विकास वर्ग व इंग्रजी संभाषण वर्ग हे त्यांचे उपक्रम सुरूच असतात. या त्यांच्या पुस्तकात त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व प्रत्येक लेखात जाणवते. पुस्तकाचे समर्पक मुखपृष्ठ अनिल कांबळे, कोकरुड यांचे आहे.

रुजवण, संविधानिक मूल्यांची…

लेखक : सुषमा सामंत

प्रकाशक : राजगृह प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे : 136

मूल्य : रु. 210/