जीवनशैली-आहार + व्यायाम

183

राजेश शृंगारपुरे,[email protected]
अभिनेत्री अनुजा साठे… व्यायाम, आहार स्वत:साठी किती आवश्यक आहे हे तिला पुरतं उमगलेलं आहे… त्यानुसार तिने स्वत:ला आरोग्यपूर्ण आणि आपसूकच सुंदर राखले आहे…

अवघ्या दोन भागांतच ‘फुलोरा’तील ‘व्यायामशाळा’ या माझ्या सदराला पसंती दर्शवल्याबाबत सर्वप्रथम सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार! असे म्हटले जाते की, ‘घरातील स्त्री निरोगी तर संपूर्ण घरपरिवार निरोगी’ अस्सल पुणेकर अभिनेत्री… ‘अनुजा साठे-गोखले…’

‘थॉटस् बी हेल्दी’ या व्यायामविषयक ब्रीदवाक्यातूनच तिच्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व अधोरेखित होते. आपल्या अभिनय कौशल्याच्या वैविध्यतेमुळे खूपच कमी वेळात नावारूपाला आली. अनुजा साठे हिचा पुणे येथून सुरू झालेला अभिनय प्रवास मराठी – हिंदी मालिका करीत थेट मराठी आणि हिंदी सिनेक्षेत्रापर्यंत पोहोचला. अभिनेता सौरभ गोखलेसारखा उमदा, देखणा जोडीदार तिला भेटला आणि तिच्या आयुष्याला सोनेरी किनार लाभली. व्यायामाविषयी तिची प्रतिक्रिया जाणून घेताना क्षणाचाही विलंब न करता ती उच्चारली, ‘‘सौरभ, आय वुड कॉल हिम माय इन्स्पिरेशन’’ अनुजा लहानपणापासून जरी स्पोर्टशी निगडित असली, शाळेत व्यायामाबाबत पाया रचला गेला तरी व्यायामविषयक तिने गंभीर दखल घेतली ते सौरभमुळेच.

व्यायाम… आवड की गरज?

अनुजाच्या मते, कोणतेही काम हे मनापासून आवड असल्याशिवाय साध्य होत नाही. मग ते कितीही गरजेचे असो. व्यायामाबद्दलही तसेच. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत व्यायामाची गरज लक्षात घेऊन त्याबाबत आवड निर्माण करावयास हवी. निदान तासभर तरी चालणे, धावणे या स्वरूपात शारीरिक सक्रियता हवी. म्हणूनच व्यायाम ही गरजही आहे आणि तो उत्तमरीत्या पार पडावा यासाठी आवड ही फिफ्टी फिफ्टी.

व्यायाम पद्धती आणि व्यायाम प्रशिक्षक

अनुजा व्यायामाविषयी अभ्यासू आहे हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. आपल्या व्यायाम प्रशिक्षकासोबत आपले सूर जुळणे महत्त्वाचे. तिने हे स्वानुभवाने स्पष्ट केले. सौरभचा मित्र मानस कुलकर्णी हा तिचा व्यायाम प्रशिक्षक. अनुजा जेव्हा पुण्यात असते तेव्हा मानस तिच्याकडून वर्कआऊट करून घेतो. विशेष म्हणजे मानसने अशा व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे, ज्यांनी एव्हरेस्ट पादाक्रांत केला आहे. तसेच मानसमुळे व्यायाम आणि आहार यातील बारकावे तिला कळल्याचेही तिने स्पष्ट केले. जसे की… ठराविक आहारातून ठराविक प्रमाणात प्रथिने शरीरास मिळणे. तिच्यासाठी हे एक वेगळे परिमाण असल्याचे तिने उस्फूर्तपणे सांगितले.

गप्पा रंगत गेल्या. व्यायाम करताना तिची मुख्य अडचण म्हणजे सतत कुणीतरी तिला (पुश) आधार देणे अथवा प्रोत्साहित करणे. कधी कधी 15 रेप्सनंतर 16वा रेप जाईल का? अशी शंका मनात येऊन ती कच खाते आणि गिव्ह अप करते. नेमके हेच काम प्रशिक्षक मानस अगदी उत्तमरीत्या करवून घेतो. शंका मनात आली की त्याचे आत्मविश्वासात रूपांतर करणे हीच तर खास कला आहे त्याची. तसेच दररोज व्यायाम किती प्रमाणात करवा यावरही तो लक्ष ठेवून असतो. अति व्यायामामुळे शारीरिक दुखापत होणार नाही याची पुरेपूर काळजी तो घेतो. संपूर्णतः वेट ट्रेनिंगवर अवलंबून न राहता. सहनशक्ती वाढावी, हृदयाचे कार्य उत्तम राहावं यासाठी कार्डियो पद्धतही करून घेतो. पुण्यातील एआरएआय किंवा हनुमान टेकडीवर 5 किमी धावणे हा त्याचाच एक भाग.
निरोगी राहणे किती महत्त्वाचे आहे हे सांगताना अनुजाने तिच्या आईची एक शिकवण सांगितली. ती म्हणते, ‘‘सीर सलामत, तो पगडी पचास.’’ शरीर निरोगी आणि सुदृढ राहिले तरच भविष्यातील सगळय़ा योजना यशस्वी होतील. खरंच किती मोलाची शिकवण आहे. माझ्या मते, अनुजाला व्यायामाची महती समजवणारी तिची आई. हीच तिची पहिली व्यायाम प्रशिक्षक होय.

अनुजाला बॅक एक्सरसाईज करण्यास आवडतात. याचे कारण विचारता तिने अगदी रोखठोक उत्तर दिले, ‘‘बॅक (पाठीचा कणा आणि खांदे) हे मला माझ्या शरीरातील मजबूत अंग वाटते.’’

केटोजेनिक आहार पद्धतीचा अवलंब

केटोजेनिक आहार हा चरबीयुक्त, पुरेशी प्रथिनेयुक्त कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहाराचा प्रकार आहे. ‘ताक’ हे उपयुक्त. त्यामुळे ते रोजच्या आहारात असावे आणि साखरयुक्त पदार्थ पूर्णतः टाळावेत असेही सांगते. त्यामुळे हळूहळू शरीराला सवय होते की, कार्बोहायड्रेटपेक्षा चरबी वापरणे आणि नेमके हेच या आहार पद्धतीचे मूळ विशेष आहे. सुरुवातीस सांगितल्यानुसार अनुजाची अभ्यासुवृत्ती येथे कामी आली. कारण कोणत्याही आहारतज्ञांचा (डाएटीशियन) सल्ला न घेता स्वतःहून तिने गुगलद्वारे माहिती संपादन केली आणि ही आहार पद्धत अवलंबिली.

इथे अनुजाने एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे ही आहार पद्धती तुम्ही आजीवन अवलंबू शकत नाही, तर दोन ते तीन महिने अवलंब करू शकता. तसेच केटोजेनिक आहारासोबत दररोज व्यायाम करणेही बंधनकारक आहे.

अनुजाने या आहारविषयक एक मुद्दा ठळकपणे मांडला. तो म्हणजे हा आहार घेणे हे प्रत्येकाच्या शरीररचनेवर किंवा त्याच्या शाकाहार/ मांसाहार असण्यावरही बेतलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला काय खाणे पचते, हे साधारणतः त्याला स्वतःलाच नीट कळू शकते. हे एक हायप्रोटिन डाएट आहे. अनुजा मांसाहारी असल्याने ती नेहमी मांस, अंडी खाऊ शकते. मात्र कुणी शाकाहारी असल्यास ती व्यक्ती पनीर, टोफू किती दिवस खाणार? असा एक शंकास्वरूप प्रश्न तिला पडतो. त्यामुळे प्रत्येक एका व्यक्तीनुसार केटोजेनिक आहाराचे नियोजन बदलू शकते असे अनुजाचे स्पष्ट मत आहे.

या आहाराचा अवलंब करण्याबाबत दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यामागील नेमका हेतू काय? फॅट लॉस, इंच लॉस की वेट लॉस? कारण हे तिन्ही प्रकार वेगळे आहेत, हे अनुजाने आपल्या व्यायामविषयक सखोल अभ्यासामुळे सांगितले. या आहारात भात-पोळी नसते, त्यामुळे डायट्री सप्लीमेन्ट, मल्टी व्हिटॅमिन, मिनरल्स इत्यादी शरीरास पोषकतत्त्वे मिळणे गरजेचे असते. इथेदेखील सौरभचे मार्गदर्शन तिला लाभल्याचे तिने स्पष्ट केले.

अनुजाची ध्येयपूर्ती

शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकानुसार स्वतःला फिट ठेवण्यासाठी सुडौल दिसण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. कधी कधी शूटिंग उशिरा संपत असे, मग व्यायाम रद्द होई. पुन्हा सकाळी लवकर उठून पुन्हा तारेवरची कसरत करीत शूटिंगला पोहोचा. अशा धावपळीत तिचे मध्यंतरी वजन वाढून 60 किलो झाले होते. ‘लगोरी’ ही मालिका करताना दररोज शूटिंग असे रात्री 9.30 ला पॅकअप झाले की, कांदिवलीवरून ती जीमला पोहोचत असे. 10 ते 10.15 ला व्यायाम सुरू. तिचा प्रशिक्षकही तिला याबाबत सहकार्य करीत होता. पुढे अशा प्रकारे रोजची सवय झाली, पण अनुजाने आपल्या व्यायामसाधनेत व्यत्यय येऊ दिला नाही आणि 2 ते 3 महिन्यांच्या अथक परिश्रमाने स्वतःचे वजन 53 किलोवर आणून ठेवले. पुन्हा एकदा पहिल्यासारखे सुडौल आणि आकर्षक दिसण्याचे ध्येय तिने गाठले.
खास स्त्रीवर्गासाठी अनु-जागरुकता
अनुजा मुख्यत्वे वेट ट्रेनिंग या व्यायाम प्रकारास प्राधान्य देते. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत गुरफटलेल्या समाजात गैरसमजुतींचे सावट आहे. त्यात महिलांनी‘ वेट ट्रेनिंग का करायचे, त्यांना कुठे बॉडी बिल्डर व्हायचे आहे ही त्यातील मेख आहे. एका अपुऱया ज्ञानापोटी झालेला समज. मुळात स्त्री आणि पुरुष यांचे हार्मोन्स परस्परभिन्न असतात. वेट ट्रेनिंगमुळे स्त्रियांचे शरीर पुरुषांप्रमाणे पिळदार न होता उलट ते सुडौल होण्यास मदत होते. समस्त स्त्रीवर्गाने मुख्य फरक समजून घेतला पाहिजे की, वेट ट्रेनिंगमुळे जो फॅट्स लॉस होतो, तो कार्डिओमुळे होत नाही आणि कार्डिओमुळे जो स्टॅमिना वाढतो, तो वेट ट्रेनिंगमुळे होत नाही. म्हणून दोन्ही आवश्यक. मात्र बॉडी टोनिंगसाठी वेट ट्रेनिंग करणे अत्यावश्यक असल्याचे अनुजाने स्पष्ट केले.

आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अनुजा साठे-गोखले… आज गप्पांच्या मैफलितही उजवी ठरली. तिच्या या महत्त्वपूर्ण योगदानास कौतुकास्पद थाप!जीवनशैली.

आपली प्रतिक्रिया द्या