
येत्या 16 मे रोजी मुंबईकरांना आणि 17 मे रोजी ठाणे -डोंबिवलीकरांना दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे.
पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असलं तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘शून्य सावलीचा दिवस’ असे म्हटले जाते.
वर्षातील दोन दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्याने भर दुपारीही आपली थोडी तरी सावली दिसतच असते. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्यादिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर आल्याने आपली सावली नेमकी आपल्या पायाशी येते. त्यामुळे ती आपणास दिसू शकत नाही.
महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी…
रत्नागिरी 11 मे , सातारा, सोलापूर 12 मे, धाराशीव 13 मे, रायगड, पुणे, लातूर 14 मे, अंबेजोगाई, केज 15 मे, मुंबई, नगर, परभणी, नांदेड, 16 मे n ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण, पैठण 17 मे, संभाजीनगर, जालना, हिंगोली, चंद्रपूर 19 मे, नाशिक, वाशीम, गडचिरोली 20 मे, बुलढाणा, यवतमाळ 21 मे, वर्धा 22 मे, धुळे, अकोला, अमरावती 23 मे n भुसावळ, जळगांव, नागपूर 24 मे, नंदुरबार 25 मे
























































