कोकणातील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग, सरकारी नोकरी सोडून एक हजार बांबूच्या रोपांची लागवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षामध्ये कोकणातील शेतकरी नाविन्यतेची कास धरत आहेत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना जादा उत्पन्न मिळवून देणारी पिके शेतकरी घेऊ लागले आहेत. अशाच प्रकारचा नाविन्यपूर्ण प्रयोग ओणी येथील डॉ. शैलेश शिंदेदेसाई यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी शंभर फूट उंच वाढणार्‍या टुल्डा, बाल्कोवा, लेटीफॅरस, भिमा या बांबूंच्या प्रजातींची लागवड केली आहे. देशाच्या पूर्व भागात लागवड होत असलेल्या या बांबूच्या प्रजाती आता कोकणच्या लाल मातीमध्येही रुजल्या आहेत.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून पदवी आणि पीएचडी पूर्ण केल्यानंतर डॉ. शिंदेदेसाई यांनी अर्थार्जनासाठी नोकरी स्वीकारली. मात्र, शेतीक्षेत्राला व्यवसायिकरूप देण्याकडे त्यांचा कल असल्याने त्यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेती क्षेत्राची कास धरली. त्यातून, त्यांनी राजापूर तालुक्यातील ओणी येथे शेतीवर नवनवीन प्रयोग केले आहेत. यामध्ये शेततळे, रोपवाटिका, मत्स्यपालन, ग्रामीण पर्यटन, काजू प्रक्रिया उद्योग, गोपालन, आंबा-काजू लागवड आदी विविध व्यवसाय उभे केले आहेत.

दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल करणार्‍या डॉ. शिंदेदेसाई यांनी बांबूला मोठ्या प्रमाणात असलेली मागणी, कमी खर्चामध्ये हमखास जादा उत्पन्न मिळत असल्याचे ओळखून एक हजार बांबूंच्या रोपांची लागवड केली आहे. यामध्ये पारंपरिक माणगा, चिवा या बांबूंसह आसाम, मिझोराम, अरुणाचल, मणिपूर आदी राज्यांमध्ये लागवड होत असलेल्या बांबूच्या प्रजातींची लागवड केली आहे. बांबूची काही बेटे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. अशा बांबूंची तोड करण्यात आली असून याद्वारे उत्पन्न मिळायला लागल्याचे डॉ. शिंदेदेसाई यांनी दैनिक ‘सामना’सोबत संवाद साधताना सांगितले. त्यांच्या या व्यवसायात वडील सुभाषचंद्र शिंदेदेसाई, आई विजयादेवी शिंदेदेसाई यांच्यासह पत्नी शुभांगी आणि मित्र परिवाराने मोलाची साथ दिल्याचेही डॉ. शिंदेदेसाई यांनी यावेळी नमूद केले.

बांबूला मोठ्या प्रमाणात मागणी
शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळवून देणार्‍या बांबूला मोठ्या प्रमाणात मागणी असते. स्थानिक प्रजातींसह भारताच्या मणिपूर, अरुणाचल, आसाम आदी पूर्व हिंदुस्थानातील राज्यांमध्ये आढळणाऱ्या बाबूंच्या एक हजार रोपांची लागवड केली, मात्र हा अभिनव प्रयोग ठरला. त्या परिसरातील आणि कोकणातील वातावरणामध्ये काहीसे साम्य असल्याने या बांबूंची चांगलीच वाढ होऊन उत्पन्नही चांगले मिळण्याची आशा आहे.
– डॉ. शैलेश शिंदेदेसाई