ई-पीक पाहणीला शनिवारपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अडीच महिन्यांत जिल्ह्यातील 2 लाख 83 हजार 943 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची मोबाईल ऍपद्वारे शेतकऱयांनी नोंदणी केली आहे. एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत ही नोंदणी फक्त 63.80 टक्के झाली. शंभर टक्के क्षेत्राची नोंदणी व्हावी, यासाठी ई-पीक पाहणीस 22 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

गेल्या वर्षापासून खरीप व रब्बी पिकांची सातबारावर ऑनलाइन नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार यंदादेखील ऑनलाइन पिकांची नोंदणी केली जात आहे. खरीप हंगामासाठी यंदा जिह्यातील 4 लाख 45 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीस निश्चित केले. यंदा शेतकऱयांनाच आपापल्या पिकांची मोबाईल ऍपद्वारे नोंदणी करण्याची सक्ती केली.

पहिल्या दीड महिन्यात शेतकऱयांनी या नोंदणीकडे दुर्लक्ष केले. 9 ऑक्टोबरपर्यंत 1 लाख 67 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नोंदणी झाली होती. 15 ऑक्टोबर नोंदणीची डेडलाईन होती. त्यामुळे गेल्या 6 दिवसांत नोंदणी मोठय़ा प्रमाणात झाली. 15 ऑक्टोबरपर्यंत 2 लाख 83 हजार 943 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची नोंदणी झाली. त्यासाठी 2 लाख 63 हजार 665 शेतकऱयांनी मोबाईल ऍपचा वापर केला. अद्यापि 36 टक्के खरीप क्षेत्रावरील पिकांची नोंदणी रखडली आहे. सातबारा उताऱयावर पिकांची नोंदणी झाली तरच शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. त्यासाठी सातबारावर पिकांची नोंदणी महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने ई-पीक पाहणी कार्यक्रमास 22 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत झालेली पीक नोंदणी (हेक्टरमध्ये)

z अकोले 10 हजार 170, नगर 17 हजार 146, कर्जत 29 हजार 19, कोपरगाव 24 हजार 655, जामखेड 20 हजार 532, नेवासा 14 हजार 645, पाथर्डी 18 हजार 354, पारनेर 22 हजार 409, राहाता 20 हजार 685, राहुरी 31 हजार 122, शेवगाव 14 हजार 49, श्रीगोंदा 15 हजार 471, श्रीरामपूर 23 हजार 506, संगमनेर 22 हजार 175.