नेत्रदानाविषयी व्यापक जागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. वर्धमान कांकरिया

हिंदुस्थानात 25 ऑगस्ट ते 8 सष्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. आज श्रीलंकेसारख्या देशात डोळे काढण्याचा अधिकार सरकारचा आहे म्हणून श्रीलंका हा देश स्वतःची गरज पूर्ण करून संपूर्ण जगात अतिरिक्त डोळे उपलब्ध करून देतो. हिंदुस्थानात दरवर्षी एक लाख डोळय़ांची गरज भासते, परंतु फक्त 50 हजार डोळे नेत्रदानामुळे उपलब्ध होतात.

‘मरावे परी कीर्ती रुपे उरावे’ किती सार्थ आहे ही म्हण! आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत दान देण्यास अनन्यसाधारण  महत्त्व आहे. आपल्या जवळील  एखादी वस्तू ज्यांच्याकडे त्याची कमतरता आहे अशा व्यक्तीस दान देण्यात जे आत्मिक समाधान  लाभते त्याची कल्पना करता येणार नाही. जुन्या काळी राजे, श्रीमंत वगैरे धन, कपडे,  अन्नदान करीत असत व गरीब लोकांचा दुवा घेत. आजच्या युगात लोकांचा जीव वाचविण्यासाठी ‘रक्तदान’, अंध लोकांना दृष्टी प्राप्त होण्याठी ‘नेत्रदान’ व वैद्यकीय ज्ञानासाठी व संशोधनासाठी मरणोत्तर ‘देहदान’ एखाद्या गरजू व्यक्तीस ‘किडनी दान’ इ. नवीन संकल्पना रुढ  होत आहेत व यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणीही  सामान्य  व्यक्ती धर्म, लिंग, वर्ण, भेद न ठेवता हे सत्कार्य करू शकतो व मानवतेची मूल्ये रोखू शकतो.

जगातील 8 कोटी अंध व्यक्तींपैकी हिंदुस्थानात जवळपास 1/4 अंध व्यक्ती आहेत. कुपोषण, ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव, डोळ्यात कचरा अथवा रसायने गेल्यामुळे, गोवर, कांजण्या   किंवा इतर  अन्य कारणांमुळे  टीक पडून लहान वयात अथवा तारुण्यात दृष्टी गमावलेल्या रुग्णांची संख्या 25 लाखांपर्यंत आहे. यास कोरेनाओपेसिटी अथवा टीक अथवा  गुल पडणे असे म्हणतात. अशा व्यक्तीच्या आयुष्यासमोर किर्रर्र काळोख पसरलेला असते.  यातील बऱयाच नेत्ररुग्णांना बुबुळावरील  आवरण जे पांढरे झाले आहे. त्याची शस्त्रक्रिया करून जर त्या जागी निरोगी पारदर्शक बुबळ बसवण्यात आले तर गेलेली दृष्टी  बऱयाच अंशी परत लाभू शकते.

सन 1924 साली अमेरिकेत अशी कल्पना सुचली व ती यशस्वी झाली आणि अंधःकारात एका प्रकाशाचा झोत आला. या शस्त्रक्रियेस ‘नेत्ररोपण’ असे म्हणतात. मृत व्यक्तीने स्वेच्छेने केलेले नेत्रदान जिवंत व्यक्तींना डोळस बनवू  लागले. परंतु दुर्दैवाने आजही ही चळवळ अंधाचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात आली नाही. म्हणूनच 25 ऑगस्ट ते 8 सष्टेंबर या कालावधीत हिंदुस्थानात नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. हिंदुस्थानमध्ये दरवर्षी एक लाख डोळय़ांची गरज भासते, परंतु फक्त 50 हजार डोळे नेत्रदानामुळे उपलब्ध होतात. आज श्रीलंकेसारख्या देशात डोळे काढण्याचा अधिकार सरकारचा आहे. म्हणून श्रीलंका हा देश स्वतःची गरज पूर्ण करून संपूर्ण जगात अतिरिक्त डोळे उपलब्ध करून देतो.

कुणीही जातीधर्म, वंशभेद, वर्णभेद, गरीब, श्रीमंत, स्त्री-पुरुष, लहान-मोठा मरणोत्तर नेत्रदान करू शकतो. वय साधारण 1 वर्षापुढे ते सुमारे 70-80 वर्षांपर्यंत. मृत व्यक्ती जर जॉन्डीस, व्हायरल मोनंनजायटीस, कॅन्सर, डोळ्यास पूर्वी काही शस्त्रक्रिया झाली असल्यास, एड्स, बुडून मृत्यू आल्यामुळे, फाशी घेतल्यामुळे इ. काही  कारणे असू शकतात. म्हणून रुग्णांचे मृत्यू निदान डोळे काढण्यापूर्वी होणे आवश्यक आहे. नेत्रदान करण्यासाठी सर्वप्रथम आपण मरणोत्तर नेत्रदान करू इच्छिता  याची आपल्या नातेवाईकांस माहिती द्यावी व आवश्यक ते फॉर्मस् जवळच्या नेत्रपेढीत भरून द्यावे. असे इच्छापत्र भरलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी लगेच मृत्यूकारणमीमांसा करून घ्यावी व जवळच्या  नेत्रपेढीस कळवावे. मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर बर्फाच्या पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात व अधूनमधून ऑण्टिबायोटिक थेंबाची औषधे डोळ्यात टाकावीत. खोलीतील पंखे बंद करावेत यामुळे डोळे  वाळणार नाहीत. मृत्यूनंतर साधारण 4-6 तासांत डोळे काढता येतात. अशा डोळ्यांचे ‘नेत्ररोपण’  साधारणपणे 24-48 तासांत करता येते, परंतु काही कल्चर मीडिया, लिक्विड नायट्रोजन व अन्य रासायनिक प्रक्रियेमुळे  महिना दोन महिनेदेखील  असे डोळे वापरता येतात. काढलेला डोळा हा संपूर्ण कधीच बसविला जात नाही त्यातील बुबुळाचा भागच फक्त बदलला जातो. सर्व गोष्टी योग्य प्रकारे घडल्यावर सर्वसाधारण 70 टक्के  शस्त्रक्रिया यशस्वी होतात. जर दाता व गरजू दोन्हीही तरुण असल्यास व डोळे काढणे आणि शस्त्रक्रिया यात जास्त वेळ गेला नाही तर यशस्वीतेचे प्रमाण सर्वाधिक असते. जर दाता व गरजू  यांच्या पेशी एकमेकास अनुरूप न झाल्यास अशा शस्त्रक्रिया अयशस्वी होऊ शकतात.

 बुबुळावर टीक पडून अंधत्व येणे दुर्दैवाने लहान मुलांत, तरुणांमध्ये, काम करणाऱया वर्गात आढळून येते. हिंदुस्थानात सुमारे 25 लाख लोकांमध्ये या अंधत्वाचे कारण असून जगात सर्वात जास्त अंध व्यक्ती हिंदुस्थानात राहतात. ज्या वयात काम करून राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे त्या वयात या तरुणांनी समाजावर व राष्ट्रावर भार टाकावा, परावलंबी जीवन जगावे ही गोष्ट देशासाठी भूषणावह नाही. या लोकांना नेत्रदानाशिवाय पर्याय नाही 25 लाख गरजू आणि नेत्रदान फक्त 35 ते 40 हजार हे फारच व्यस्त प्रमाण आहे. अंधश्रद्धा व अज्ञान यामुळे नेत्रदानाचे प्रमाण हिंदुस्थानात कमी आहे.

हिंदुस्थानमध्ये नेत्रपेढीच्या संख्येत वाढ व्हायला हवी या सुविधा अतिशय अपुऱया आहेत. आता नेत्रदान केलेल्या बुबुळाचे वेगवेगळे विभाग दोन किंवा अंध व्यक्तींना वापरता येतात यावर जगात मोठय़ा प्रमाणात संशोधन चालू आहे. हिंदुस्थानात याचे प्रमाण कमी आहे. नेत्रपेढय़ा उभारण्यावर मोठा खर्च येतो त्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे यावे सरकारनेही आर्थिक मदत करावी. या प्रकारचे अंधत्व गरीब लोकांमध्ये अधिक आहे. शस्त्रक्रियेचा खर्च त्यांना झेपणार नाही सरकारने यासाठी ही आर्थिक मदत करावी तरच व्यापक प्रमाणात ही मोहीम राबविता येईल.

(लेखक महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे सहसचिव आहेत.)