बोटांच्या ठश्याशिवाय आधार कार्ड बनू शकणार, वाचा बातमी

आज देशभरात सगळ्यात महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड. महत्त्वाच्या सरकारी योजनांपासून ते आर्थिक व्यवहारांपर्यंत सगळी कामं ही आधारकार्डवर अवलंबून असतात. आता या आधारकार्डासंबंधी एक महत्त्वाची बातमी मिळत आहे.

आता आधार कार्ड बनवण्यासाठी बोटांचे ठसे अनिवार्य असणार नाहीत. UIDAIने आधार कार्डसंबंधित नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार, जर एखादी व्यक्ती तिच्या बोटांचे ठसे देण्यासाठी शारीरिकदृष्ट्या असमर्थ असेल तर तिलाही आधार कार्ड बनवता येऊ शकतं. या नवीन नियमानुसार, जेव्हा हातांचे ठसे मिळू शकणार नसतील, तेव्हा डोळ्यांच्या स्कॅननेही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि आधार कार्ड बनवता येईल.

केरळ येथील एका महिलेच्या तक्रारीनंतर हा बदल करण्यात आला आहे. जोसीमोल पी. जोस असं या महिलेचं नाव आहे. आधार कार्डासाठी नाव नोंदवल्यानंतर फक्त हाताची बोटं नसल्याने तिचं आधार कार्ड बनू शकत नव्हतं. त्यामुळे हा बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे.