
वि. प. मार्ग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांचा दोघांनी हुज्जत घालताना व स्वतःची नावपट्टी भिरकावतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याने खळबळ उडाली होती. पण आता त्याच प्रकरणाचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी महिला उपनिरीक्षकासोबत कशा प्रकारे हुज्जत घालण्यात आली, व्हिडीओ काढणाऱ्यांनी मोबाईल अंगापर्यंत नेल्याने फौजदार महिलेचा संयम सुटल्याचा जबाब दिला आहे.
कर्ज वसूल करण्यासाठी कर्जदाराच्या कार्यालयात घुसून शिवीगाळ व दादागिरी करणाऱ्या व्यक्तीविरोधात वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी ती व्यक्ती एका महिलेसह पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी दोघांनी महिला उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांच्याशी हुज्जत घालत त्याचे रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली.समोरचे सारखेच नाव विचारू लागल्याने खर्डे यांनी नावपट्टी काढून भिरकावली. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. पण आता या प्रकरणातला दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ काढणाऱ्या दोघांनी मॅडमशी हुज्जत घातली. ते मोठमोठ्या आवाजात वारंवार नाव विचारून चित्रीकरण करत असलेला मोबाईल खर्डे मॅडम यांच्या अंगाजवळ नेत होते. त्यामुळे मॅडम संतापल्या आणि त्यांनी नावाची पट्टी काढून भिरकावल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.