फेसबुक तेरे तुकडे….; फेसबुकच्या सहसंस्थापकाचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फेसबुकचे सहसंस्थापक असलेल्या क्रिस ह्यूस यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख लिहून फेसबुकचे तुकडे व्हावेत असे मत व्यक्त केले आहे. फेसबुकला नियमावलीची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. फेसबुकचे तुकडे व्हावेत म्हणजे फेसबुकची विभागणी विविध कंपन्यांमध्ये करायला हवी असे ते म्हणाले. व्हॉटसअप, इंस्टा आणि मेसेंजर या वेगळ्या कंपन्या असायल्या हव्यात, असे ते म्हणाले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या हातात प्रंचड शक्ती एकवटली आहे. त्यामुळे फेसबुकची विभागणी होण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

क्रिस ह्यूस यांनी झुकेरबर्ग यांच्यासोबत 15 वर्षांपूर्वी फेसबुकची स्थापना केली होती. त्याकाळी जुकेरबर्ग आणि क्रिस दोघेही हॉवर्ड विद्यापीठात शिकत होते. त्यानंतर 2007 मध्ये क्रिस यांनी फेसबुक सोडून ओबामा यांच्या प्रचारासाठी काम करायला सुरुवात केली. क्रिस यांनी त्यांच्या लेखात जुकेरबर्ग यांच्यावर टीका केलेली नाही. जुकेरबर्ग चांगले व्यक्ती आहेत. मात्र, त्यांच्याकडे जास्त शक्ती एकवटत आहे. ते योग्य नाही, त्याचा धोका आहे, असेही ते म्हणाले. एका व्यक्तीच्या हातात एवढ्या शक्ती एकवटणे योग्य नसते असेही ते म्हणाले. सुमारे दशकभरात फेसबुक अर्ध्या ट्रिलियन डॉलरचे मूल्य असलेली कंपनी बनली आहे. जगातील सोशल नेटवर्गीकच्या महसूलापैकी 80 टक्के महसूल फेसबुकचा आहे. सोशल मिडियात फेसबुकची एकाधिकारशाही वाढल्याने या क्षेत्रातील स्पर्धा संपत असल्याकडेही क्रिस यांनी लक्ष वेधले आहे. गेले दशकभर माझा फेसबुकशी संबंध नाही. मात्र, त्यातील जबाबदारी आणि धोके याची जाणीव मला आहे, असेही त्यांनी सांगितले.

फेसबुकच्या वाढत्या एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. फेसबुक आपले प्राबल्य राखण्यासाठी आणि एकाधिकारशाही ठेवण्यासाठी स्पर्धक कंपन्या खरेदी करणे, त्यांची कॉपी करणे किंवा त्यांना ब्लॉक करणे यासारख्या अनेक पद्धती वापरत आहेत. फेसबुकने इंस्टाग्राम अधिग्रहीत करण्यासाठी फेडरल ट्रेड कमीशनने दिलेली मंजुरी ही सरकारचा अयोग्य निर्णय होता असेही क्रिस यांनी म्हटले आहे. त्यामुळे फेसबुकची विभागणी करण्यासाठी सरकारने दबाव टाकावा असे मतही त्यांनी व्यक्त केले.