
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जगभरातील प्रभावी समाज माध्यम असलेल्या फेसबुकची विश्वासार्हता आणि सुरक्षेलाच तडा जाऊ लागल्याची बाब समोर आली आहे. याआधी फेसबुक युजरचा डाटा चोरीला गेल्याचे समोर आलेले असतानाच आता कंपनीचा सर्वेसर्वा आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग याच्या काही जुन्या पोस्ट डिलीट झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या पोस्ट आपल्या टीमकडून चुकून डिलीट झाल्याचे फेसबुकने स्पष्ट केले असले तरी त्या चुकून डिलीट झाल्या की अन्य त्रयस्थाने सुरक्षेमधील त्रुटींचा फायदा घेत उडवल्या असा सवाल केला जात आहे.
फेसबुकचे जगभरात कोट्यवधी युजर आहेत. एखाद्या युजरने संवेदनशील किंवा आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर कंपनीच्या टीमकडून तत्काळ डिलीट केली जाते. मात्र फेसबुकडून आता मार्क झुकेबरर्ग यांच्याच 2007 आणि 2008 या दोन वर्षांतील पोस्ट डिलीट झाल्या आहेत. डिलीट झालेल्या पोस्ट किती होत्या, त्यामध्ये काय माहिती होती याचा थांगपत्ताही फेसबुकला नाही. त्यामुळे झुकेरबर्ग यांचे अकाऊंट सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य युजरचे काय, असा सवाल केला जात आहे. दरम्यान या सर्व पोस्ट चुकून डिलीट असून त्या कंपनीच्या ब्लॉग किंवा न्युजरूममध्ये मिळू शकतील असे मत फेसबुकच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
लाखो युजरचे पासवर्ड उघड होण्याची भीती
फेसबुक युजरची माहिती वेळोवेळी चोरीला गेलेली असतानाच आता युजरचे पासवर्ड उघड होण्याची भीती व्यक्त होत आहे. क्रेब्स ऑन सिक्युरिटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फेसबुकने युजरचे पासवर्ड प्लेन टेक्स्टच्या स्वरूपात जतन करून ठेवले आहेत. ते कंपनीमध्ये काम करणारा एखादा कर्मचारी सहजपणे बाहेर काढू शकतो. त्यामुळे पासवर्डच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान अशा पद्धतीने युजरचे पासवर्ड लीक होणे शक्य नसल्याचे फेसबुकने म्हटले आहे.


























































