
फेसबुकवर जास्तीत जास्त फॉलोअर्स मिळावेत व त्याआधारे मोठी प्रसिद्धी मिळावी यासाठी दाऊद नावाचा केक आणि त्याखाली दाऊदचे फोटो फेसबुकवर अपलोड करणे कुर्ल्यातल्या एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. झटपट प्रसिद्धीसाठी दाऊदच्या नावाचा केक सोशल मीडियावर अपलोड करणे त्याला भलतेच महागात पडले आहे.
26 डिसेंबर रोजी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा वाढदिवस डोंगरीतील काही तरुणांनी साजरा केल्याबाबतचे वृत्त सोशल मीडियातून प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल घेत खंडणीविरोधी पथकाने तत्काळ तपास सुरू केला. दाऊदच्या वाढदिवसाची पोस्ट फेसबुकवर टाकणारा अजहर फिरोज मनियार ऊर्फ शेरा चिकना हा तरुण असून तो कुर्ला पश्चिमेला राहतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता असे निष्पन्न झाले की, एक महिन्यापूर्वी अजहरचा वांद्रे येथे राहणारा मित्र दाऊद हाश्मी याचा वाढदिवस बीकेसीतील हर्बल शिश लाँज येथे साजरा झाला होता. त्यावेळी अजहरने वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे व दाऊद लिहिलेल्या केकचे अनेक फोटो काढले होते. दरम्यान, दाऊद नावाच्या केकचा अजहरने आपल्याला झटपट प्रसिद्धी मिळावी यासाठी करण्याचा ठरवले. 26 तारखेला दाऊद इब्राहिमचा वाढदिवस असल्याने त्याने फेसबुकवर तो केक व त्याखाली दाऊद इब्राहिमचे तीन फोटो अपलोड केले. ही पोस्ट नंतर व्हॉटस्ऍप, यू टय़ूब आदी सोशल मीडियावरदेखील प्रसिद्ध झाली. याबाबत मोहसीन शेख याने एका दैनिकात बातमी दिल्यानंतर अजहरने मोहसीनला फोन करून धमकावले होते. त्यामुळे मोहसीनच्या तक्रारीवरून अजहरच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे.


























































