
का रे दुरावाSSS का रे अबोलाSSS! फडणवीस आणि शिंदे एकाच हॉटेल मध्ये पण ना भेट ना बोलणे, महायुतीतील नाराजी, शिंदे गटाची हवा टाइट
महायुतीतील खदखद ही आधीच चव्हाट्यावर आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपचे बडे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र अमित शहा यांनी शिंदे यांचे काही एक ऐकून घेतले नाही. यामुळे शिंदेंच्या गटाची अवस्था अत्यंत वाइट झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील दुरावा तर वाढतोच आहे, मात्र त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात देखील कटूता आल्याचे पाहायला मिळत आहे. विविध सभांमधून फडणवीस आणि शिंदे यांनी एकमेकांवर नाव न घेता टीका केली आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच अनुभव येत आहे. यावर का रे दुरावाSSS का रे अबोलाSSS अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनांमुळे महायुतीत नाराजी आहेच पण शिंदे गटाची हवा टाइट असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. इथून ते पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे रविवारी रात्री पासूनच शहरातील रामा इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये आले आहेत. तरी दोघांची एकमेकांशी भेट किंवा बोलणे झालेले नाही. त्यामुळे त्या दोघांमधील आणि भाजप आणि शिंदे गटातील दुरावा अधोरेखित झाला आहे.
त्याच दरम्यान,एकनाथ शिंदेंसोबत उड्या मारत सुरत मार्गे गुवाहटीला गेलेल्या शहाजीबापू पाटल्यांच्या कार्यालयावर ईडी ने छापा टाकला आहे. यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता वाढली आहे.
याआधी देखील फडणवीस आणि शिंदे मुंबईत हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी एकत्र आले होते. मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं तर सोडाच पण पाहिले देखील नाही अशा बातम्या, व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसले होते.



























































