कुटुंब रंगलंय ड्रग्जच्या व्यवसायात, मुलगा, मुलीनंतर बापाला 12 लाखांच्या एमडीसह अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रग्जच्या तस्करीत मुलगा आणि मुलगी पकडले गेल्यानंतर आता त्यांचा ड्रग्ज तस्कर बाप पोलिसांच्या हाती लागला आहे. गुन्हे शाखेने अहमद शेख (62) याला 110 ग्रँम एमडीसह माहीममध्ये पकडले. 12 लाख 25 हजार इतकी त्या जप्त केलेल्या एमडीची किंमत आहे.

माहीम पश्चिमेकडील कनाकिया टॉवरजवळील गल्लीत एक जण एमडीचा साठा घेऊन येणार असल्याची खबर वरळी युनीटला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरावर पाळत ठेवली. दरम्यान अहमद शेख हा एमडी घेऊन तेथे येताच पोलिसांनी त्याला हटकले. तेव्हा पोलीस असल्याचे समजताच अहमदने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 110 ग्रॅम एमडीचा साठा मिळाला. हे एमडी त्याने कुठून आणले व ते तो कोणाला विकणार होता याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान याआधी वरळी युनीटने अहमदचा मुलगा जावेद ऊर्फ जावा याला एक किलो 150 ग्रॅम वजनाच्या चरससह पकडला होता. तर घाटकोपर युनीटने अहमदची मुलगी हजमा हिला 100 ग्रॅम एमडी आणि दोन किलो 700 ग्रॅम चरस साठय़ासह पकडले होते. मुलगा व मुलगी नंतर आता त्यांचा बाप ड्रग्जसह पोलिसांच्या हाती लागला.