
सामना ऑनलाईन । मुंबई
जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक पद्मश्री डी.के. दातार यांचे बुधवारी रात्री उशिरा गोरेगाव येथील रुग्णालयात वृद्धपकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, डॉ. निखिल आणि डॉ. शेखर, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी गोरेगाव येथील शिवधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पंडित सतीश व्यास, पंडित ओमकार बिलवडे, शिष्य मिलिंद रायकर, राजन माशेलकर आदी उपस्थित होते.
व्हायोलीन वादनाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कलावंत अशी डी.के. दातार यांची ओळख होती. गायकीच्या अंगाने व्हायोलीन वादन करणारे कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. दातार यांच्या निधनाने व्हायोलीनचा सच्चा साधक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हिंदुस्थानी संगीतात मोठे योगदान असलेल्या देवधर मास्तरांच्या ठस्कूल ऑफ इंडियन म्युझिक’मध्ये पंडितजी दाखल झाले. तिथे पंडित विघ्नेश्वर शास्त्राr यांच्यासारखे व्हायोलीनवर कमालीचे प्रभुत्व असलेले गुरू त्यांना लाभले. आपल्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाच्या पलीकडे जात डी.के. दातार यांनी आपल्या प्रतिभेने व्हायोलीन वादनाच्या विश्वात स्वतःची वेगळी छाप उमटवली.
पंडित. डी.के. दातार यांच्या आधी 100 वर्षांची व्हायोलीन वादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलीन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. हिंदुस्थानी संगीतात व्हायोलीन वादनाची पद्धत रुजवण्याचे मोठे काम दातार यांनी केले. ख्याल, ठुमरी, भजन यासारख्या गायनकलेतील प्रकारांत त्यांनी प्रावीण्य मिळवले. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत मैफलीत साथसंगत केली आहे. सरकारने त्यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.



























































