‘फनी’चा हाहाकार! ओडिशात चक्रीवादळाचे थैमान; प्रचंड हानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, भुवनेश्वर

पुरीच्या किनारपट्टीवर सकाळी आठ वाजता धडकलेल्या फनी चक्रीवादळाने ओडिशात अक्षरशः हाहाकार माजविला. हजारो घरे जमीनदोस्त झाली. रस्ते खचले,  झाडे, विजेचे खांब कोसळले. ताशी 175 ते 243 कि.मी. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे राज्यातील 10 हजारांवर गावे आणि 52 शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली.

fani-cyclone-new-3

या वादळाने किमान 8 जणांचा बळी घेतला असून, राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. तब्बल 12 लाखांवर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दुपारी चारनंतर ‘फनी’चा जोर मंदावला, तरी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. दरम्यान, ‘फनी’ने पश्चिम बंगालच्या दिशेने आगेकूच केली आहे. कोलकातासह किनारपट्टीलगतच्या शहरांना हाय ऍलर्ट जारी केला आहे. रात्री उशिरा फनी चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम बंगालला बसला. कोलकातासह अनेक शहरांत वेगाने वारे वाहत असून मुसळधार पाऊस सुरू आहे.

fani-cyclone-new-2

1999 मध्ये ओडिशाला भयंकर चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यात 10 हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला होता. 20 वर्षांनी पुन्हा आज महाभयंकर चक्रीवादळाने ओडिशात कहर माजविला. यात खासगी आणि सरकारी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले.

उपाययोजना

  • 12 लाख लोकांना चार हजार पुनर्वसन केंद्रांत हलवले.
  • चक्रीवादळापासून बचावाकरिता 880 मदत केंद्रे उभारली.
  • ‘एनडीआरएफ’ची पथके मदतकार्यात. नौदल, हवाईदलाच्या विमानातून लोकांना अन्नाची पाकिटे पाठविणार.
  • हवाईदलाचे हेलिकॉप्टर्स, नौदलाच्या तीन युद्धनौका सज्ज.
  • युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचे ओडिशाचे विशेष मदत व पुनर्वसन आयुक्त विष्णुपाद सेठी यांनी सांगितले.

वादळात जन्मली ‘लेडी फोनी’

चक्रीवादळाने हाहाकार माजविला असताना मनचेश्वर रेल्वे हॉस्पिटलमध्ये सकाळी 11 वाजता एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. जन्माबरोबरच मुलीचे बारसेही झाले. तिचे नाव लेडी फोनी असे ठेवण्यात आले आहे. तिची आई रेल्वे रिपेअर विभागात मदतनीस म्हणून नोकरीला आहे.

चक्रीवादळाचा कहर

सकाळी आठच्या सुमारास पुरीच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकले. सुरुवातीला ताशी 175 कि.मी. वेगाने वारे वाहू लागले आणि त्यानंतर वाऱ्याचा वेग तब्बल 245 कि.मी. पर्यंत वाढला. n समुद्रात उंच लाटा उसळल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले.

  • चक्रीवादळाबरोबरच मुसळधार पावसाने कहर माजविला.
  • पुरी, गंजम, गजपती, जाजपूर, कटक, खुर्दा, बालासोरा, भाद्रक आदी 11 जिल्हय़ांना सर्वाधिक फटका बसला.
  • 10 हजारे गावे आणि 52 शहरांमधील 12 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
  • हजारो झोपडय़ा, कच्ची घरे वाहून गेली. अनेक घरे जमीनदोस्त झाली. हजारो झाडे रस्त्यावर कोसळली. वीज खांब, मोबाईल टॉवर कोसळले. राजधानी भुवनेश्वरसह राज्यातील बहुतांशी भागात दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे.
  • हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान या चक्रीवादळात झाले आहे.
  • चक्रीवादळात किमान 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पुरी येथे अंगावर झाड कोसळल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. नयागड येथे इमारतीचा भाग कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला, तर केंद्रापारा येथे निवारा केंद्रात एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
  • भुवनेश्वर येथे ‘एम्स’ पाण्याची टाकी कोसळली. इमारतीचा काही भाग आणि विजेचे अनेक खांब कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रुग्णालय आणि डॉक्टर्स सुरक्षित आहेत.
  • ओडिशात आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. तसेच विमानसेवाही बंद केली आहे.
  • भुवनेश्वर विमानतळावरील वॉचटॉवरसह विजेचे खांब कोसळले. विमानतळाचे नुकसान झाले आहे. पुरी रेल्वे स्थानकाचे छप्पर उडाले.

पश्चिम बंगालमध्ये प्रचंड घबराट

  • दुपारी चारनंतर ओडिशात वाऱ्याचा वेग ताशी 110 कि.मी.पर्यंत मंदावला. सायंकाळी आणखी कमी झाला आणि हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने सरकले. रात्री उशिरा पश्चिम बंगालमध्ये फनी वादळ धडकल्याचे वृत्त आहे.
  • कोलकातासह पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात सकाळपासून ढगांची दाटी झाली. दुपारनंतर अंधारून आले आणि पावसाला सुरुवात झाली. नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. दुपारी एकनंतर सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली.
  • रात्री उशिरा कोलाकातासह अनेक भागात फनी वादळाचा तडाखा बसला. मुसळधार पावसाने झोडपले. वीज पुरवठाही खंडित झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोलकाता आणि हल्दीया विमानतळ बंद करण्यात आले आहे. सर्व यंत्रणांना हायऍलर्ट जारी केला आहे. सुमारे चार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभा रद्द केल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
  • पश्चिम बंगालमधून पुढे आज सकाळी बांगलादेशात ‘फनी’ वादळ धडकेल.

मोठे नुकसान – मुख्यमंत्री पटनाईक

पुरीसह अनेक ठिकाणी रस्ते खचले, हजारो झाडे कोसळली. वीज खांबे कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा पूर्ववत करणे मोठे आवाहन आहे. चक्रीवादळाचा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. त्यामुळे नुकसानीचा पूर्ण आढावा घ्यायला वेळ लागेल. मात्र, या चक्रीवादळात राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सांगितले.