
टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आणि क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या सुप्रिमो चषकाचा तिसरा दिवस गाजवला तो गोलंदाजांनी. फलंदाजांचे वर्चस्व असलेल्या या स्पर्धेत शौर्य हर्षित ठाणे संघाने उमेश इलेव्हन 9 विकेट्सनी पराभव करीत सुप्रिमो चषकाच्या दहाव्या हंगामाची उपांत्य फेरी गाठली. गोलंदाजांनी गाजवलेल्या दिवसातील तिन्ही ‘सामनावीर’ पुरस्कार गोलंदाजांनीच पटकावले.
अवघ्या हिंदुस्थानात आयपीएलची हवा आहे, पण मुंबईत गेले तीन दिवस टेनिस आयपीएल सुप्रिमो चषकाचे वादळ घोंघावतेय आणि उद्या रविवारी सांताक्रुझच्या एअर इंडिया स्पोर्ट्स स्टेडियमवर क्रिकेटवेडय़ांची त्सुनामी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. स्पर्धेतील चार अव्वल संघ उपांत्य सामन्यात भिडणार असून विजेते संघ सुप्रिमो चषकाचा ऐतिहासिक करंडक आणि 11 लाखांचे इनाम पटकावण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील. टेनिस क्रिकेटचा ग्लॅमरस थरार अनुभवण्यासाठी येणाऱया हजारो क्रिकेटप्रेमींना उद्या प्रत्यक्ष सामना पाहायला मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. क्रिकेटप्रेमींची अभूतपूर्व गर्दी पाहता पोलीस आणि आयोजकांना स्टेडियमची आसनक्षमता फुल्ल झाल्यानंतर मैदानाचे द्वार बंद करावे लागणार आहे, याची सर्व प्रेक्षकांना आधीच कल्पना देण्यात आली आहे.
आज टेनिस क्रिकेटप्रेमींना तिन्ही सामन्यांत थरार अनुभवता आला नाही. उपांत्य फेरीचा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा होती, पण ती पह्ल ठरली. पहिल्या फेरीत कर्नाटकच्या एफएम हॉसपेट संघाला अवघ्या 38 धावांवर रोखणारा उमेश इलेव्हन ठाण्याच्या शौर्य हर्षित संघाविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्या उभारेल असे वाटत होते, पण विवेक शेलार, इम्ब्रोज खान आणि विश्वनाथ जाधव यांच्या भेदक माऱयापुढे उमेश इलेव्हनचा संघ 43 धावांपर्यंतच पोहोचू शकला. या पूर्ण डावात उमेश इलेव्हनच्या फलंदाजांनी दोनच चौकार ठोकले तर शौर्य हर्षितच्या गोलंदाजांनी त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावाही करू दिल्या नाही. विवेक शेलारने नदीम धनोरी आणि महिपाल चावडा या आघाडीवीरांना शून्यावर टिपत उमेश इलेव्हनच्या डावाला सुरुंग लावला. नवव्या क्रमांकाच्या अमित कोरीने 5 चेंडूंत केलेली 9 धावांची खेळी डावातील सर्वोच्च खेळी ठरली. शौर्य हर्षितने 44 धावांचे लक्ष्य 3 षटकांतच पूर्ण केले.सुमित ढेकळेने 11 चेंडूंत 29 धावा करीत संघाला तिसऱया षटकांतच उपांत्य फेरी गाठून दिली. सलामीवीर अंकित मौर्यने सुनील नाईकला षटकार खेचत संघाला मोठा विजय मिळवून दिला. 6 धावांत 2 आघाडीवीरांना बाद करणारा विवेक शेलार शौर्यच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
झळाळता चषक कोण उंचावणार?
उपांत्य लढतीत कोणते संघ खेळणार याचा फैसला उद्या सोडतीनेच होईल. पण सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेचा झळाळता चषक कोण उंचावणार याबाबत साऱयांनाच उत्सुकता लागली आहे. 2017 आणि 2022 साली बाजी मारणारा उमर इलेव्हन बाजी मारतो की डिंग डाँग जेतेपदाचे साँग गातो, हे निश्चितपणे कुणीच सांगू शकत नाही. सुप्रिमोमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या शौर्य हर्षित कोणते शौर्य दाखवतो याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत. सुप्रिमो चषकाच्या विजेत्याला टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप तसेच टेनिसची आयपीएल जिंकल्याचा अनुभव यावा म्हणून आयोजक संजय पोतनीस यांनी 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या हिंदुस्थानला दिला गेलेल्या प्रुडेन्शियल वर्ल्ड कपची प्रतिकृती बनवली आहे. विजेता आणि उपविजेता अशा दोन्ही संघांना हे कप दिले जाणार आहेत. एवढेच नव्हे तर विजेता संघ 11 लाखांचा मानकरी ठरेल तर उपविजेता 9 लाखांचा कमाई करेल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला लाल रंगाची मारुती एक्सप्रेसो दिली जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या तिघांना यमाहाची फॅसिनोज दिली जाणार आहे.
इम्ब्रोज ठरला सामनावीर
पहिल्या लढतीत शौर्य हर्षितने विश्वनाथ जाधवच्या 14 चेंडूंतील 25 धावा आणि अख्तर शेखच्या 10 चेंडूंतील 13 धावांमुळे बालाजी पंधारी किंग्जपुढे 72 धावांचे आव्हान ठेवले होते. इम्ब्रोज खान आणि वरुण कुमारने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेत बालाजी पंधारीला 43 धावांवरच रोखले. शौर्य हर्षितच्या सर्व गोलंदाजांनी बालाजी पंधारीच्या फलंदाजांना एकेका धावासाठी अक्षरशः रडवले. त्यामुळे शौर्य हर्षितने सहज विजयाची नोंद केली. 11 धावांत 3 विकेट घेणारा इम्ब्रोज खान विजयाचा शिल्पकार ठरला.
सुनील नैनचा भेदक मारा
दुसऱया सामन्यातही गोलंदाजांची कमाल दिसली. उमेश इलेव्हनच्या सुनील नैनने अवघ्या 5 धावांत 4 विकेट घेत कर्नाटकच्या एफएम हॉसपेटला चाळिशीसुद्धा गाठू दिली नाही. उमेश इलेव्हनने 39 धावांचे माफक लक्ष्य 4 षटकांत पूर्ण केले. 4 विकेट टिपणारा नैनच ‘सामनावीर’ ठरला.































































