
विधान परिषदेत मुदत संपलेल्या 8 सदस्यांना सोमवारी निरोप देण्यात आला. यात शिवसेनेचे रामदास कदम, गोपीकिशन बजोरिया, काँग्रेसचे भाई जगताप, सतेज पाटील, भाजपचे अमरीश पटेल, प्रशांत परिचारक, गिरीश व्यास आणि एनसीपीचे अरुण जगताप यांची मुदत संपल्यामुळे त्यांना निरोप देण्यात आला. या 8 पैकी भाजपचे अमरीश पटेल आणि काँग्रेसचे सतेज पाटील हे पुन्हा निवडून आले आहेत. या 8 सदस्यांची मुदत 1 जानेवारीला संपणार आहे.
मी शेवटपर्यंत शिवसेना सोडणार नाही – रामदास कदम
मी संपूर्ण समाधानी असून माझा मुलगाही आता आमदार आहे. कोणत्याही पक्षात भांडय़ाला भांडे लागतेच. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. मला साथ दिली तशी उद्धवला साथ द्या, असे बाळासाहेबांनी अखेरच्या दिवसात सांगितले होते. त्याप्रमाणे मी शेवटपर्यंत शिवसेना सोडणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आत्म्याला दुःख होईल असे मी काहीही करणार नाही, अशा भावना विधान परिषद सदस्य रामदास कदम यांनी निरोपाच्या भाषणात व्यक्त केल्या.





























































