
शेतातील कामे आटोपून मोटारसायकलवर मागे बसलेल्या एका शेत मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ही महिला बेशुद्ध झाली असून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 21 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता घडली.
अनिता कैलास भोसले (32) असे जखमी महिलेचे नाव आहे. श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथील शेतकरी नारायण आव्हाड यांच्या शेतातील काम सुरू आहे. काम आटोपून मजूर महिलेस मोटारसायकलवरून महांकाळ वाडगावला घरी सोडायला गेला असता रस्त्यात अचानक बिबट्याने महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचे डोके आणि पाठीवर बिबट्याने पंजाने मारल्याने जखमा झाल्या आहेत.
हल्ल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. तिच्यावर उंदीरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर महिला शुद्धीवर आली. नंतर श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेवर उपचार केले असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे सांगून पुढील उपचार नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये घ्यावे लागतील, असे सांगितले आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले. बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचा जीव घेतला आहे. अशावेळी वेळेवर वन अधिकारी उपलब्ध नसतात. तक्रार करण्याकरिता मोबाईल बंद असतो, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
























































