19,000 किलो बटाट्याचे मिळाले फक्त 490 रूपये, शेतकरी मोदींना म्हणाला तुम्हीच ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, आगरा

शेतात प्रचंड कष्ट करून पिकवलेल्या 19 हजार किलो बटाट्यांचे एका शेतकऱ्याला फक्त 490 रूपये मिळाले आहेत. या थट्टेमुळे संतापलेल्या शेतकऱ्याने मिळालेले सगळे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डरद्वारे पाठवून दिले आहेत. शेतमालाला दुप्पट हमी भाव देण्याची आश्वासनं देणाऱ्या मोदी सरकारच्या योजनांमधील फोलपणा या घटनेमुळे पुन्हा उघड झाला आहे.

प्रदीप शर्मा नावाचा हा शेतकरी नगला नाथू गावचा रहिवासी आहे. गेली चार वर्ष त्याला शेतीमध्ये बरंच नुकसान सहन करावं लागलं आहे. या वर्षी त्याच्या शेतात बटाट्याचं चांगलं पीक आल्याने तो खूश होता. मात्र त्याचा आनंद काही क्षणातच गायब झाला. या शेतकऱ्याने बटाट्यांसाठीचे विविध अधिभार आणि ते साठवून ठेवण्यासाठी शीतगृहाच्या भाड्याची रक्कम भरल्यानंतर त्याचा हातामध्ये फक्त ४९० रूपये उरले होते. अशी थट्टा सहन करण्यापेक्षा मला मरण्याची परवानगी द्या अशी मागणी या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.