
आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरु केले असताना रामचंद्र मोहिते या शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
यंदाच्या आंबा मोसमात केवळ 12 टक्के उत्पादन आल्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडला. अत्यल्प उत्पादनामुळे कर्जाचे हफ्ते भरणेही बागायतदारांना अशक्य झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरु केले. आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस होता.
रत्नागिरीतील शेतकरी रामचंद्र लक्ष्मण मोहिते यांनी शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. आंबा नुकसानीमुळे शेतकऱ्यांना प्रति कलम 15 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, बँका शेतक-यांवर जप्तीची कारवाई करत आहेत ती थांबवण्यात यावी. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आंबा, काजू शेतक-यांना कर्जमाफी देण्यात यावी अशा विविध मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

























































