पीक कर्जमाफीची प्रक्रिया सुरू; बँकांकडून प्रस्ताव मागविले

746

जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना पीक कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यासाठीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. महसूल विभागाने त्यावेळी केलेले नुकसानीचे पंचनामे बँका आणि सोसायट्यांना पाठविण्यात आले असून पात्र शेतकर्‍यांचे पीक कर्जमाफीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नगर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून देण्यात आली.

जुलै-ऑगस्टमध्ये शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. तत्कालीन सरकारने त्याच महिन्यात निर्णय घेऊन नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. एक हेक्टरवरील पिकासाठी घेतलेले पीक कर्ज यामध्ये माफ करण्यात येणार आहे. त्यावेळी महसूल यंत्रणेने पंचमानेही केले होते. याच्या याद्या संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, नेवासा, कर्जत व श्रीगोंदा येथील तहसीलदार कार्यालयांकडून तालुका निबंधकांमार्फत मागविण्यात आल्या आहेत. या याद्या आता संबंधित सर्व बँकांच्या शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तसेच तालुका उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयास पीक कर्जमाफी मागणी प्रस्ताव तयार करण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत. तेथून कर्जमाफीचे प्रस्ताव तयार करून निधी मिळण्यासाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या