
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 200 शेतकरी शहीद झाले असून या शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत हरयाणाचे कृषिमंत्री जेपी दलाल यांनी वादग्रस्त विधान करीत शेतकरी आंदोलनाचा अपमान केला आहे.
शेतकरी घरी असते तरी ते मेले असते, शेतकऱयांचा मृत्यू त्यांच्या इच्छेनुसारच झाला असल्याचे खेदजनक वक्तव्य कृषिमंत्री जेपी दलाल यांनी रविवारी केले. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर त्यांनी याप्रकरणी माफी मागत आपल्या वक्तव्यांचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण दिले.
दिल्लीत गेल्या 81 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत 200 शेतकऱयांचा मृत्यू झाला असून देशभरातून या शेतकऱयांना श्रद्धाजंली वाहण्यात येत आहे. तर दुसरीकडे हरयाणाचे कृषिमंत्री जेपी दलाल यांनी या शेतकऱयांच्या मृत्यूबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे.
आज जे शेतकरी घरी आहेत. त्यांचा मृत्यू झालेला नाही का? अनेक जण हृदयविकाराच्या झटक्यामुळे मेले आहेत, तर काही जणांचा मृत्यू हा आजारपणामुळे होतो, असे वादग्रस्त विधान जेपी दलाल यांनी केले आहे. त्यांच्या या विधनानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
एसी आणि कुलरची व्यवस्था करणार
उन्हाळ्यात शेतकरी आंदोलन टिकण्यासाठी एसी आणि कुलरची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी सरकारने आम्हाला विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. जर सरकारने विजेचा पुरवठा केला नाही तर जनरेटरची व्यवस्था करावी लागेल असेदेखील टिकैत यांनी यावेळी सांगितले. जनरेटर आणि डिझेलसाठी लोकांनी मदत करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
रेल रोकोसाठी पोलिसांकडून विशेष पथक तैनात
किसान संयुक्त मोर्चाकडून येत्या 18 फेब्रुवारी रोजी देशव्यापी रेल रोकोचा हाक देण्यात आली आहे. या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनीदेखील आपली तयारी सुरू केली असून दिल्लीच्या सोनीपत रेल्वे स्थानकाजवळ राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
तोपर्यंत माघार नाही – राकेश टिकैत
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कृषी कायद्याविरोधात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. जोपर्यंत सरकार हे कायदे माघारी घेत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी घोषणा त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.
शेतकऱयांनी सुरक्षा वाढवली
शेतकरी आंदोलनादरम्यान 26 जानेवारी झालेल्या हिंसाचारानंतर किसान संयुक्त मोर्चाने आपली अंतर्गत सुरक्षा वाढविल्याचे कळते. तब्बल 150 शेतकऱयांचे एक पथक तयार करण्यात आले असून हे पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. या शेतकऱयांच्या मदतीसाठी वॉकीटॉकीची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.



























































