फेसबुकला शेतकऱ्यांचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या शेती कायद्याच्या विरोधात जगभरातील शेतकरी एकत्र येऊन दिल्लीत आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला अनेक थरातून वाढता पाठिंबादेखील मिळत आहे. दुसरीकडे काही लोक जाणूनबुजून या आंदोलनाबद्दल आणि आंदोलक शेतकऱ्यांबद्दल सोशल मीडियाचा वापर करून विविध अफवादेखील पसरवत आहेत.

सोशल मीडियाद्वारे होत असलेल्या बदनामीला आणि खोटय़ा आरोपांना सामोरे जाण्यासाठी आणि आंदोलकांची खरी बाजू जनतेसमोर आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने फेसबुकवरती आपले किसान एकता मोर्चा पेज तयार केले होते. जोडीलाच संयुक्त किसान मोर्चाने ट्विटर, इंस्टाग्राम, यूटय़ुब, स्नॅप चाट इत्यादी सोशल प्लॅटफॉर्म्सवरतीदेखील आपली खाती उघडली होती. या सर्व प्लॅटफॉर्मवरती त्यांना प्रचंड मोठा प्रतिसाददेखील मिळत होता. अवघ्या चार दिवसांत लाखोंच्यावर लोकांनी या पेजला लाइक आणि फॉलो करायला सुरुवात केली.

रविवारी संध्याकाळी संयुक्त किसान मोर्चाने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती, जी त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून लाइव्ह दाखवण्यात येत होती. मात्र ही पत्रकार परिषद संपताच आपले पेज बंद झाल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या आयटी टीमच्या लक्षात आले. एवढेच नव्हे, तर त्याच वेळी त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंटदेखील बंद झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बातमी सार्वजनिक होताच सोशल मीडियावरती एकच गदारोळ उडाला.

शेतकऱ्यांच्या जोडीनेच अनेक नेटिझनांनी याचा निषेध तर नोंदवलाच, जोडीला फेसबुक शेतकरीविरोधी कार्य करत असून आंदोलकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याच्या आरोप मोठय़ा प्रमाणावर होण्यास सुरुवात झाली. या गदारोळानंतर काही तासांतच संयुक्त किसान मोर्चाचे पेज पुन्हा पूर्ववत चालू करण्यात आले. हे पेज बंद होण्यामागे तांत्रिक कारण असल्याचा खुलासा फेसबुककडून करण्यात आला आहे. या पेजवरती अचानक खूप साऱया पोस्ट, लाइक्स, कमेंट्स येऊ लागल्याने मशीनने त्याला दिलेल्या कोडिंगनुसार साऱया अचानक होणाऱया भरमसाट हालचाली संशयास्पद मानून त्या पेजला फ्लॅग केले, अर्थात स्पॅम समजून बंद केले असा दावा फेसबुकने केला आहे.