जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात शेतकर्‍यांचा प्रवरा नदीपात्रात ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमनेर 

नगर जिह्यातील जनतेच्या विरोधाला न जुमानता भंडारदरा, निळवंडे धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात दहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असल्याने निळवंडे धरणात 8.1 टीएमसी पाणीसाठा झाला असून, निळवंडे धरण 99 टक्के भरले आहे.  त्यामुळे भंडारदरा धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला असून, तो दुपारी चार हजार क्युसेक्सने सुरू होता. निळंवडे धरण भरल्यामुळे कोणत्याही क्षणी जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार असून, त्यासाठी जलसंपदा विभागाने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, कॉ. अजित नवले यांच्यासह शेतकर्‍यांनी प्रवरा नदी पात्रात अकोले येथे अगस्ती पुलावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी प्रवरेचे पाणी पुला खालून फक्त दोन फुटावरून वाहत आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आपल्या पथकासह घटनास्थळी आहेत. तसेच तहसिलदार मुकेश कांबळे हे देखील उपस्थित आहेत. या जागी आंदोलन करू नका, धोकायदायक जागा आहे. आपल्यासह कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालू नका, आपली मागणी तातडीने शासनाला कळविली आहे, अशी विनंती तहसिलदार कांबळे यांनी केली आहे.

नगर जिह्यातील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातूनही मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. या भागातील जनतेने पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. बंद, रास्ता रोको, मंत्र्यांना निवेदने, ताफा अडवणे, चाकबंद अशी विविध आंदोलने केली आहेत, तर काही आंदोलनांचा इशारा दिला आहे.

नगर जिह्यातील अकोले तालुका दुष्काळग्रस्त यादीत नसल्याने येथील जनता व नेते जास्तच आक्रमक झाले आहेत. मात्र, हा विरोध डावलून सोमवारी कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाची संपूर्ण तयारी झाली आहे. फक्त पोलीस बंदोबस्त व यंत्रणा मिळण्याची वाट हा विभाग पाहत असून, पोलीस बंदोबस्त मदत मिळताच पाणी सोडण्यात येणार आहे.

भंडारदरा धरणातून गेल्या चार दिवसांपासून दहा हजार क्युसेक्सने निळवंडे धरणात विसर्ग सुरू होता. त्यामुळे आज निळवंडे धरण 99 टक्के भरले असून, आज दुपारी भंडारदरा धरणातून होणार विसर्ग चार हजार क्युसेक्सवर आणण्यात आला आहे. सध्या निळवंडे धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरू असल्याने पाणी संगमनेरच्या ओझर बंधार्‍यापर्यंत वाहते आहे. या मार्गावरील नदीपात्रात असणारे सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. बंधार्‍यांच्या फळ्यादेखील काढण्यात आल्या आहेत. साधारण तीन दिवसांत जायकवाडी धरणात पाणी पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भंडारदरा आणि निळवंडे धरणांतून 3.85 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. सुरुवातीला सहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असून, नंतर दोन-दोन हजारने वाढवत अंतिम दहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा धरणातूनही याचवेळी पाणी सोडण्यात येणार असून, सुमारे 1.90 टीएमसी पाणी या धरणातून सोडण्यात येणार आहे. सुरुवातीला दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असून, नंतर ते सहा हजार क्युसेक्सपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

मुळा धरणातून सोडलेले पाणी नेवासा तालुक्यातील पाचेगावजवळ प्रवरा नदीला मिळते. नंतर या दोन्ही नद्या प्रवरासंगमजवळ गोदावरी नदीला मिळतात. त्यानंतर हे पाणी जायकवाडी धरणाकडे जाते. प्रवरा नदीला पाणीपातळी वाढणार असल्याने नागरिकांनी पाण्याकडे जाऊ नये, मोटारी काढून घ्याव्यात, दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

नगर जिह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता येथील नागरीकांना पाणी सोडण्याविरोधात घेतलेली भुमीका योग्य आहे. सरकारने आधी नगरच्या जनतेचा विचार केला पाहिजे. अकोल्यासहीत अन्य तालुके दुष्काळी म्हणून जाहिर केले पाहीजे, अशी आमची मागणी आहे. मराठसाड्याला पाणी देण्यास जनतेने विरोध दर्शवला आहे. अकोला तालुका दुष्काळी भाग आहे. तसाच शिर्डी, कोपरगाव, नेवासा आदी भागांमध्ये दुष्काळाच्या झळा मोठय़ा प्रमाणावर बसल्या आहेत, पाणी सोडताना आधी आमच्या जिह्यातील बंधारे भरुन घेतले पाहिजे होते. मात्र, तसे न करता, पाणी सोडण्याचा निर्णय घेतला म्हणून जनतेचा उद्रेक आता पहायला मिळाल आहे. अकोले येथे सर्वपक्षीय आंदोलने सुरु झाले आहेत, आपण जनतेच्या पाठीशी असून आपणही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. – सदाशिव लोखंडे, खासदार. 

आमचे हे आंदोलन अकोले तालुका दुष्काळी जाहिर करण्यासाठी आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या पद्धतीने पाणी सोडण्यास विरोध नाही, पण अकोले तालुका दुष्काळी व कोरडा ठेवून तूम्ही पाणी सोडूच शकत नाही. आधी दुष्काळ जाहिर करा, मग पाणी सोडा. तोपर्यंत पाणी सोडू देणार नाही. आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. – कॉ. अजित नवले, अकोले.