
जिल्हा सहकारी बँकेच्या 68व्या सर्वसाधारण सभेत आज शेतकऱ्यांच्या असंतोषाचा ज्वालामुखी फुटला. “कर्जमाफी करा, कर्जमाफी करा!” अशा घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी थेट उठाव केला. “आमचे प्रचंड नुकसान झाले आहे, आधी कर्जमाफी द्या!” अशी हाक देत शेतकरी विखे यांच्या भाषणातच घुसले.
जिल्हा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बँकेबद्दल चिंता व्यक्त केलेली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या भाषणामध्ये तोच धागा पकडला. आणि शरद पवार यांचे नाव न घेता जाणता राजाला बँकेची चिंता करायची आवश्यकता नाही. आम्ही त्यासाठी सक्षम आहोत, असे म्हटले. यावेळी सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी अगोदर आम्हाला न्याय द्या, असे म्हणत त्यांनी विखे यांच्या भाषणादरम्यान कर्जमाफी द्या, कर्जमाफी द्या, अशी मागणी लावून धरली. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी आम्ही नियमित कर्ज भरून सुद्धा आम्हाला एक दमडीही मिळाली नाही. त्याचं काय? असा सवाल उपस्थित केला.
गोंधळामुळे खुद्द पालकमंत्री विखे यांनाही माघार घ्यावी लागली. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीशी सूर जुळवत, “तुमची जी मागणी आहे, तीच माझीही मागणी आहे. कर्जमाफी दिलीच पाहिजे” असे जाहीर वक्तव्य करावे लागले.
Ahilyanagar News – पावसाने दाणादाण उडवली; 423 गावे बाधित, 84 हजार 860 हेक्टर क्षेत्राचे नुकसान
दुसरीकडे, सभापती आमदार राम शिंदे यांनी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले. राज्य सरकारने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे वास्तव शिंदेंना कबूल करावे लागले. “खरंच काहींना लाभ मिळाला नाही, काहींनाच मिळाला आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे” अशी स्पष्ट कबुली शिंदे यांनी दिली.
सभेत शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला. “आम्ही नियमित कर्जफेड केली तरी, आम्हाला एक दमडीही मिळाली नाही. पन्नास हजार मिळणार म्हणाले, तेही मिळाले नाही” असा प्रश्नांचा भडीमार केला. परिणामी संपूर्ण सभागृह घोषणांनी दणाणले.