बारामती तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
farmer-suicide-01

सामना प्रतिनिधी । सुपे

सरकारने कर्जमाफी केली असतानाही शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतच असून बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

शिवाजी बबन चांदगुडे (वय ६५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीा आली.

बारामतीत शेतकऱ्याचे कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याचे सत्र अद्यापही संपलेले नाही. मागील वर्षी तालुक्यात सुमारे सहा ते सात आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दंडवाडी येथे संतराज महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी येणार असल्याने सर्वच ग्रामस्थ गावच्या मुख्य रस्त्याकडे आले होते. यावेळी शिवाजी चांदगुडे त्या ठिकाणी होते. मात्र, काही वेळाने त्यांनी दंडवाडी-सुपे रस्त्यावरील शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी या रस्त्याने येणाऱ्या वारकऱ्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक आर. एन. साळुंके यांना दिली.

त्यांच्याकडे महाराष्ट्र बँकेचे सुमारे २ लाख ४१ हजारांचे पीककर्ज होते. तसेच, आणखी जिल्हा बँक व सोसायटीचे कर्ज आहे का, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती येथील मंडलाधिकारी राहुल जगताप, तलाठी डब्लू. एस. झगडे यांनी दिली. कर्जाच्या नैराश्यातून चांदगुडे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आकात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एन. साळुंके, फौजदार शेंडगे तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित १ मुलगा, ३ मुली असा परिवार आहे.