
खरीप हंगामात शेतपिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज स्विकारले नाहीत. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईक अर्ज करणे शक्य नाही,अशा शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचे निर्देश कृषी आयुक्त कार्यालयाकडून विमा कंपन्यांना देण्यात आले होते. मात्र, लातूरमधील औसा तालुक्यात एकाही शेतकऱ्याचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात आले नाही. त्याविरोधात उजनी येथे शेतकऱ्यांचे 5 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू आहे.
या आंदोलनात वांगजी,चिंचोली, वडजी, अशीव अशा अनेक गावातील शेतकरी सहभागी झाले आहेत. अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येत आहे. सोमवारी उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनात गुळखेडा आणि काजळे चिंचोली येथील तरुणही सहभागी झाले आहेत.
शेतपिकांचा विमा काढलेल्या आणि हप्ते वेळेत भरलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नुकसानीबाबत कंपन्यांनी भरपाई द्यावी. तसेच ऑनलाईन अर्ज दाखल करणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज स्विकारत त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी आयुक्त कार्यालयाकडून विमा कंपन्यांना देण्यात आले होते. यात काढणीनंतर तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पंचनामे ग्राह्य धरत नुकसानभरपाई देण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
काही विमा कंपन्यांकडून याचे पालन करण्यात आले नाही. तसेच याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आली नाही. कंपनीने 72 तासात ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले होते. याची माहिती अनेक शेतकऱ्यांना मिळालीच नाही. तसेच अनेक तांत्रिक आणि इतर अडचणींमुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचे पालन केले नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.



























































