विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजेचा शॉक लागून मालवण मठबुद्रुक येथील रमेश गणपत पालकर (४८) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली.

एक झाड तोडत असताना ते झाड मुख्य वाहिन्यांवर कोसळले. मुख्य वाहिन्या कोसळत असताना त्यांनी आपल्याबरोबर तीन वीज खांब आणि त्यावरील वाहिन्याही कोसळल्या. या वाहिन्या प्रवाहित असल्यामुळे खाली कोसळल्यावर त्याचा प्रवाह पाण्यातून सर्वत्र पसरला.

याचवेळी शेतातील काम संपवून घरी आलेले रमेश पालकर आराम करीत होते. घराला लागून असलेल्या वीज खांबांचा आवाज आल्याने ते आवाजाच्या दिशेने धावत गेले. त्यांचा पायाचा चिखलाच्या पाण्याला स्पर्श झाल्याने काही क्षणातच वीज खांबाकडे ओढले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पालकर यांना वाचवण्यासाठी धावत असलेले रुपेश विलास ठाकुर यांना पायाला शॉक लागल्याने ते मागे थांबले आणि त्यांनी आरडाओरड केली, त्यामुळे सात ते आठ जण बचावले. वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील संपूर्ण वीज पुरवठा तात्काळ बंद केला.

रमेश पालकर हे चिंदर येथील रहिवासी असूनही ते अनेक वर्षांपासून मठबुद्रुक येथे वास्तव्यास होते. गावातील सर्वांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून पालकर ओळखले जात. त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. पालकर यांना घटनास्थळावरून तातडीने उपचारासाठी हलविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी राजू परुळेकर, भाई घाडी, उदय सावंत, प्रमोद कदम, उत्तम मल्हार, जनार्दन सामंत, पोलीस पाटील सूर्यकांत घाडी, सत्वशिल परब उपस्थित होते.

ग्रामस्थांनी तातडीने वीज अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. वीज वितरणकडून तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. वीज तारांना स्पेसर टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी वाहिनी तुटल्यावर फ्युज बंद न पडल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करीत वीज वितरणवर नाराजी व्यक्त केली. या दुर्घटनेमुळे मठ बुद्रुक गाव दोन दिवस अंधारात होते.

आचरा पोलिसांनी पालकर यांचा मृत्यू आकस्मिक म्हणून दाखल केला आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पालकर यांची पत्नी अपंग असल्याने तिच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वीज कंपनीच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याने शासनाने तातडीने पालकर यांच्या पत्नीला आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

अपघाताबाबत उलट सुलट चर्चा

वीज वितरणचे कर्मचारी व ग्रामस्थ मठबुद्रुक येथील तारांवर आलेल्या झाडांची सफाई करीत होते. यावेळी मुख्य वीज वाहिनी बंद करण्यात आली होती असे सांगण्यात आले. मात्र प्रवाहित वीज वाहिन्यांमुळे अपघात झाला. त्यामुळे नेमका वीज पुरवठा सुरू असताना झाडी तोडली जात होती की झाडे तोडल्यावर वीज वाहिन्या सुरू केल्यानंतर हा अपघात घडला. की वीज पुरवठा चालू असलेल्या तारा तुटून अपघात घडला. याची उलट सुलट चर्चा सुरू होती.