
नवीन कृषी कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय राजधानीच्या बॉर्डरवरून हटणार नसल्याच्या भूमिकेवर हजारो शेतकरी आजही ठाम आहेत. शेतकऱ्यांनी 18 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 4 या वेळेत देशव्यापी रेल रोकोची हाक दिली आहे, तर पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी 14 फेब्रुवारीला देशभरात मेणबत्ती मोर्चा काढणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी संघटनांच्या शिखर संस्थेने दिली.
‘क्रोनीजीवी’ देश विकताहेत!
‘आंदोलनजीवी’ हा नवा शब्द देशाला मिळाल्याचं सांगत पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडविली होती. आंदोलनजीवी या शब्दाचा आधार घेत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. हे तर देशाला विकणारे ‘क्रॉनीजीवी’ आहेत, असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
हॅशटॅग जोरात
आंदोलनजीवी हू, जुमलाजीवी नही, असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर 60 हजारांहून अधिक ट्किट करण्यात आले आहेत. बुधवारी देशातील टॉप ट्वीटर ट्रेण्ड ठरला.
शेतकरी ‘जुमलाजीवी’ नाहीत!
पंतप्रधान मोदी यांनी ‘आंदोलनजीवी’ असे संबोधून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. देशाला स्वातंत्र्यच आंदोलनांमुळे मिळाले आहे, असे सांगतानाच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी हल्लाबोल केला. शेतकरी हे भाजपसारखे ‘दंगाजीवी’ आणि ‘जुमलाजीवी’ नाहीत. आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारने खूप प्रयत्न केला. मात्र, सरकार आंदोलनात कोणी जयचंद शोधू शकले नाही. शेतकऱ्यांची एकजूट कायम आहे. आंदोलन तुटणार नाही. आम्ही भाजप सरकारसारखे ‘दंगाजीवी’ आणि ‘जमुलाजीवी’ नाहीत, असे टिकैत यांनी सुनावले.


























































