‘मोदी सरकारचं धोरण, शेतकऱ्यांचं मरण’, लोणीच्या शेतकऱ्यांनी हंसराज अहीर यांना सुनावले खडेबोल

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील लोणी येथे ‘घर चलो अभियान’ कार्यक्रमासाठी आलेले ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना शेतकऱ्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. शेतमालाला भाव, पिकविमा परतावा, सिंचनासाठी वीज न मिळणे असे अनेक मुद्दे मांडत शेतकऱ्यांनी अहीर यांनी धारेवर धरले.

मोदी सरकारच्या योजना समाजविण्यासाठी भाजप नेत्यांचे घर चलो अभियान’ सुरू आहे. मात्र या नेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत असून अनेक गावांमध्ये या अभियानाचा रथही पिटाळून लावल्याचे समोर आले. अशातच माजी खासदार आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर हे लोणी गावात आलेले असताना शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. त्यामुळे अहीर निरुत्तर झाले. लोणी गावात अहीर यांचा रात्रीचा मुक्काम ठरला होता, मात्र शेतकऱ्यांच्या रोषामुळे ते आल्या पावली माघारी फिरले.

सोयाबिन आणि कापसाचे भाव घसरले आहेत. सोयाबिनला प्रति क्विंटल चार ते साडे चार हजार इतका निचांकी भाव मिळतोय. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकविमा भरूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नुकसानीचा अत्यल्प मोबदला मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. याशिवाय सिंचनासाठीही वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पाण्याअभावी पिकं करपली आहेत.

अशातच न केलेल्या कामाचा ढोल मोदी सरकार बडवत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. दिखावा करण्याऐवजी शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या याच संतापाचा सामना हंसराज अहीर यांना करावा लागला. घोडा मैदान दूर नाही, असे म्हणत शेतकऱ्यांनी अहीर यांना इशाराही देत आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणीही केली.