
सामना प्रतिनिधी । आखाडा बाळापुर
बायकोसोबत भांडणात आईला साथ देतो याचा राग धरून पित्यानेच आपल्या तेरा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान घडली असून पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे.
कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील रहिवाशी असलेल्या बाबुराव भगवानराव शिखरे वय 35 हा मद्यपी आहे. यामुळे त्याचे बायकोसोबत सतत भांडण होते. भांडणा दरम्यान तो बायकोला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण करतो. यावेळी त्यांचा 13 वर्षीय मुलगा वैभव आईच्या बाजूने राहतो याचा शिखरेच्या मनात राग होता. शुक्रवारी मध्यरात्री शिखरेने वैभवला ‘तुला मामा कडे घेऊन जातो’ असे सांगून स्वतःच्या ऑटोरिक्षामध्ये बसवले. दरम्यान, शिखरेने मध्यरात्री 2 ते 3 दरम्यान, नांदेड-हिंगोली रोड वरील कुर्तडी पाटीजवळ रिक्षा थांबवली आणि अचानक वैभवचा दोरीने गळा आवळला. वैभव तडफडत आहे पण त्याचा जीव जात नाही हे पाहताच त्याचे डोके रिक्षावर जोरजोरात आदळले. असे करूनही जीव जात नाही हे पाहून त्याने वैभवच्या डोक्यात मोठा दगड घातला. यात वैभव जागीच मृत्यू झाला. वैभवला मारल्यानंतर शिखरेने मृतदेह रिक्षात टाकून आपल्या मावस भावाच्या दारात पायरीवर आणून ठेवला. तसेच, मी मुलाचा खून केला असे ओरडू लागला. यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली.
आखाडा बाळापुरचे प्रभारी पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, फौजदार सविता बोधनकर, संतोष नागरगोजे, गजानन भालेराव, गजानन मुलगीर आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.


























































