मुलीच्या खून प्रकरणात बापाला 4 दिवस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

दागिन्यांकरून झालेल्या वादात संदीप यादवराव चौधरी याने मुलगी कोमल हिचा गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पत्नी नयना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संदीप याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संदीप हा 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता मुलीला क्लासमधून घेऊन गेला. त्यानंतर त्याने बांभोरी पुलाखाली घेऊन जात मुलीचा खून केला होता. त्यानंतर तो धुळे व पारोळा येथे पळून गेला होता. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी लागलीच त्याला पारोळ्यातून अटक केली. दरम्यान, आता संदीप याने मुलीचा खून का केला, या घटनेमागचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. घटना कशी केली, पाण्याची बाटली कोठून विकत घेतली हा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी घटनास्थळाचे व्हेरीफिकेशन पोलिसांना करायचे आहे. तसेच संदीप सोबत आणखी कोणी संशयित आहे का हा महत्त्वाचा मुद्दा पोलीस तपासत आहेत. या कामासाठी संदीप याला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. सुनावणीअंती न्यायालयात चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पत्नीसोबत दागिन्यांकरून झालेल्या वादातून हे पाऊल उचलल्याचे संदीपने प्राथमिक चौकशीत सांगितले. तर त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप हा जास्त प्रमाणात दारू पित होता. त्यामुळे होणाऱ्या भांडणातून त्याने मुलीचा खून केल्याचे म्हटले आहे. या घटनेचे नेमके कारण शोधण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे.