रासायनिक प्रक्रिया करून फळे विकणाऱ्यांवर एफडीएची कारवाई

434

रासायनिक प्रक्रिया करून फळे पिकवून बाजारात विकणाऱ्या दुकानदारांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी म्हापशात आणि शनिवारी पणजी मार्केटमध्ये धाड टाकून रासायनिक प्रक्रिया केलेली फळे जप्त करून ती नष्ट करण्यात आली.

अन्न आणि औषध प्रशासनाने आज पणजी मनपाचे महापौर उदय मडकईकर आणि मनपाच्या बाजार निरीक्षकांच्या उपस्थितीत पणजी मार्केटमधील फळ विक्रेत्यांची अचानक तपासणी करून खराब झालेली आणि रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली फळे जप्त करून ती नष्ट केली. काही ठिकाणचे नमुनेही घेण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी 6 वाजल्या पासून ही कारवाई करण्यात आली. रासायनिक प्रक्रिया करून फळे विकणाऱ्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

म्हापशात शुक्रवारी रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली केळी जप्त करून नष्ट करण्यात आली होती. अन्न आणि औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईचे स्वागत होत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून फळे विकणाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. अशीच अधूनमधून तपासणीकरून ग्राहकांना चांगली फळे मिळतील याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या