लेडीज स्पेशलमध्ये राडा,पुरुष दिव्यांगांना महिलांनी चोप चोप चोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजवर लोकलमधील दिव्यांगांसाठीच्या राखीव डब्यात धडधाकटांची घुसखोरी होताच दिव्यांग प्रवासी आरपीएफच्या 182 हेल्पलाइनवर कॉल करून पोलिसांना भंडावून सोडायचे. त्यानंतर आरपीएफने अशा धडधाकटांना पकडण्याची मोहीमच सुरू केली. परंतु बुधवारी आक्रीतच घडले. सीएसएमटीहून 6.08 वाजताच्या पनवेल महिला स्पेशल लोकलच्या दिव्यांगांच्या राखीव डब्यात दिव्यांग चढल्याने संतापलेल्या महिला दिव्यांगांनी चक्क राडाच केला. त्यामुळे कुर्ला स्थानकात ही लोकल अक्षरशः रोखण्यात आल्याने रेल्वे सुरक्षा बलाला पुरुष अपंग प्रवाशांवरच कारवाई करावी लागली.

मध्य रेल्वेच्या आरपीएफने 25 जुलैपासून अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत 22 जुलै ते 21 ऑगस्टपर्यंत दोन हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई होऊन पाच लाखांहून अधिक रुपयांचा दंड रेल्वे सुरक्षा बलाने वसूल केला असून तिघांना तुरुंगवास झाला आहे. अशा कारवाईत सापडणाऱ्या सरकारी व खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बॉसना तसेच शाळा–कॉलेजच्या प्राचार्यांनाही पत्रे लिहून मध्य रेल्वेने समज देण्याचा फंडा आजमावून पाहिला आहे, परंतु बुधवारी सीएसएमटीहून 6.06 वाजताच्या महिला स्पेशलच्या दिव्यांगांच्या डब्यात पुरुष अपंग चढले आणि अपंग महिलांचा संताप अनावर झाला व त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

जामीन देण्यास नातेवाईकांचाही नकार!

कुर्ला रेल्वे स्थानकात ही महिला स्पेशल लोकल 6.37 वाजता दाखल होताच आरपीएफची टीम लोकलमध्ये दाखल होऊन त्यांनी हा राडा थांबवला. यावेळी दहा अपंगांवर कारवाई करण्यात आली. त्यातील सहा अपंगांवर रेल्वे कायदा कलम 155 अनुसार केस रजिस्टर करण्यात आली, तर चार जणांना रुपये 373 व त्याहून अधिक रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे आरपीएफचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त अरुण त्रिपाठी यांनी सांगितले. यापैकी अनेक अपंग प्रवाशांच्या नातेवाईकांनी जामिनासाठी येण्याचीही तयारी न दाखविल्याने रेल्वे अधिकारी पेचात पडले.