FIFA WC Final 2022 जगज्जेत्यांचा नसतो गोल्डन बूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक चर्चिला जाणारा ‘गोल्डन बूट’चा मानकरी हा जगज्जेत्या संघाचा नसतो हे पुन्हा एकदा दिसून आले. यंदा आठ गोल ठोकून गोल्डन बूटचा विजेता ठरलेला किलियन एम्बाप्पे फ्रान्सला वर्ल्ड चॅम्प बनवू शकला नाही. गेल्या 22 स्पर्धांत केवळ पाचवेळाच जगज्जेत्या संघाचा खेळाडू स्पर्धेत गोल ठोकण्यात अव्वल ठरला आहे. याचाच अर्थ ‘गोल्डन बूट’चा मान हा अपवादानेच जगज्जेत्या संघाच्या खेळाडूकडे असतो.

‘गोल्डन बूट’ची शर्यत नेहमीच रोमहर्षक ठरली आहे. वर्ल्ड कपच्या प्रारंभीच्या काळात स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱया खेळाडूला ‘गोल्डन बूट’ किंवा ‘गोल्डन शू’ असा पुरस्कार दिला जात नव्हता. 1982 सालापासून फुटबॉलच्या नियमांमध्ये आमूलाग्र बदल झाला आणि तेव्हापासूनच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱया खेळाडूला ‘गोल्डन शू’ देण्याची परंपरा सुरू झाली. 2010 सालापासून ‘गोल्डन शू’चे ‘गोल्डन बूट’ असे नामकरण करण्यात आले.

स्पर्धेतला टॉप गोल स्कोरर हा नेहमी जगज्जेत्या संघाचाच असतो, असे नाही. एवढेच काय, गेल्या 40 वर्षांत म्हणजे ‘गोल्डन शू’ देण्यास प्रारंभ झाल्यापासून जगज्जेत्या संघाचा खेळाडू सर्वाधिक गोल ठोकणारा खेळाडू ठरलेला नाही. गेल्या दहा स्पर्धांतली नावे पाहिली तर 1982 साली जगज्जेत्या इटली संघाचा पावलो रॉसीने ‘गोल्डन शू’ जिंकले. त्यानंतर 2002 साली जगज्जेत्या ब्राझीलच्या रोनाल्डोने ही किमया साधली. ही दोन नावे वगळता अन्य आठ स्पर्धांत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू विजेत्या संघाचा खेळाडू नव्हता.

1982 च्या आधीचे नावे पाहिली तर 1962 साली एक नव्हे तर सहा खेळाडूंनी प्रत्येकी 4 गोल केले होते. त्यात गरिंचा आणि वावा हे दोन जगज्जेत्या ब्राझीलचेही खेळाडू होते. मात्र 1974 साली पश्चिम जर्मनीचा ग्राझगोर्झ लाटो गोल ठोकण्यात अव्वल होता आणि त्यांच्याच संघाने बाजी मारली होती. 1978 साली जगज्जेत्या अर्जेंटिनाच्या मारिओ कॅम्पसने सर्वाधिक सहा गोल ठोकले होते. त्याच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे अर्जेंटिनाने आपले पहिलेवहिले जेतेपद संपादले होते.

सहा गोल म्हणजे सर्वाधिक

फिफाचे आधुनिकीकरण झाल्यापासून म्हणजेच 1982 पासून 6 गोल ठोकणाराच खेळाडू स्पर्धेतला अव्वल खेळाडू ठरला आहे. अपवाद फक्त 2002 च्या रोनाल्डोचा. या अफलातून खेळाडूने चक्क आठ गोल ठोकत ‘गोल्डन शू’सुद्धा जिंकला होता आणि संघाला वर्ल्ड चॅम्पियनसुद्धा बनवले होते. हा अपवाद वगळता अन्य 9 स्पर्धांत टॉप स्कोरर पाच किंवा सहाच गोल ठोकू शकला आहे. फिफा वर्ल्ड कपचा इतिहास पाहिला तर 1958 साली फ्रान्सच्या जस्ट फॉण्टेन यांनी 13 गोल ठोकले होते. हा विक्रम मोडणे आता अशक्य होऊन बसलेय.